For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाची ना मिरवणूक ना सत्कार!

06:22 AM Mar 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाची ना मिरवणूक ना सत्कार
Advertisement

 आयपीएलमुळे क्रिकेटपटूंच्या कौतुकाला फाटा

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

गत वर्षी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. या विश्वविजयानंतर मायदेशी परतलेल्या टीम इंडियाचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. शिवाय मरीन ड्राईव्हवर विजयी मिरवणूक आणि वानखेडे स्टेडियमवर जंगी सत्कार सोहळादेखील आयोजित करण्यात आला होता. यंदा मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीवर तब्बल 12 वर्षांनंतर भारताचे नाव कोरले गेल्यानंतरदेखील भारतीय संघातील सर्व खेळाडू वेगवेगळ्या मार्गांनी भारतात परतत आहेत. त्यांच्यासाठी ना स्वागत समारंभ केले जात आहेत ना त्यांची मिरवणूक काढली जात आहे. अर्थात, याला कारणही तसेच असून आठवडाभरात आयपीएल सुरु असल्याने या सर्व गोष्टीला फाटा देण्यात आले असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आणली असली, तरी अवघ्या आठवड्याभरात इंडियन प्रिमियर लीगचा थरार भारतात रंगणार आहे. आयपीएलमधील काही संघ आधीच आपापल्या सामन्यांच्या ठिकाणी पोहोचले असून त्यांचा सरावदेखील सुरु झाला आहे. काही संघाचे खेळाडू अजूनही आपापल्या देशातून भारतात दाखल होणे बाकी आहे. अशात टीम इंडियामध्ये काही संघांचे कर्णधार तर काही संघामधील महत्त्वाचे खेळाडू असून त्यांना आपापल्या आयपीएल संघांसोबत पुढच्या स्पर्धेच्या तयारीसाठी अगदीच कमी वेळ मिळत असल्याने यंदाच्या कौतुक सोहळ्यांना फाटा देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर दुबईतून चॅम्पियन्स ट्रॉफी संपवून भारतात परतणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंना आपापल्या आप्तस्वकीयांसोबत वेळ घालवणे आणि त्यानंतर लागलीच आयपीएलच्या सरावासाठी आपापल्या संघात दाखल होणे ही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही कौतुक सोहळ्याशिवायच टीम इंडियातले खेळाडू भारतात परतत असून पुढील नियोजनात व्यग्र होताना दिसत आहेत.

कर्णधार रोहितसह महत्वाचे खेळाडू मायदेशात दाखल

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सोमवारी रात्री उशिरा मुंबईत परतला. यावेळी त्याच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी दिसून आली. रोहितनेदेखील क्रिकेट चाहत्यांनी दाखवलेला पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार मानले. मुलगी समायराला कडेवर घेऊन रोहित शर्मा विमानतळावरून बाहेर पडत असताना आपल्या विजयी कर्णधाराला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. याशिवाय, टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर नवी दिल्लीत दाखल झाला असून हार्दिक पंड्या अहमदाबाद, श्रेयस अय्यर मुंबईत दाखल झाले आहेत.

Advertisement
Tags :

.