ऑस्ट्रेलियाला नमवत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये
वर्ल्डकपचा बदला वर्ल्डकपमध्येच : सामनावीर रोहित शर्माची 41 चेंडूत 92 धावांची खेळी
वृत्तसंस्था/ सेंट लुसिया
रोहित शर्माची फटकेबाजी आणि कुलदीप यादव, अर्शदीप सिंग व जसप्रीत बुमराह यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर शानदार 24 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने टी 20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 205 धावा केल्या. प्रत्युतरात ऑसी संघ 7 बाद 181 धावा करु शकला. ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रेव्हिस हेडच्या 43 चेंडूंमधील 76 धावांच्या झंझावाती खेळीने वनडे वर्ल्डकपच्या फायनलच्या आठवणी जाग्या केल्या खऱ्या मात्र बुमराहने त्याचा अडसर दूर केल्यावर सामना भारताच्या दृष्टिपथात आला. आता, दि. 27 रोजी भारत व इंग्लंड यांच्यात उपांत्य सामना होईल.
भारताने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने एकाकी झुंज दिली. त्याने 43 चेंडूमध्ये 76 धावांची वादळी फलंदाजी केली. हेडने 4 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 76 धावांचा पाऊस पाडला. हेडचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार मिचेल मार्शने 37 धावांचे योगदान दिले. ग्लेन मॅक्सवेलने 12 चेंडूत 20 धावांची खेळी केली. डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉयनिस, टीम डेविड, मॅथ्यू वेड यांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादवने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले.
रोहित शर्माची तुफानी खेळी, ऑसी गोलंदाजांना झोडपले
प्रारंभी, ऑसी कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी भारताच्या डावाला सुरुवात केली पण दुसऱ्याच षटकात विराट कोहली हॅजलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराटचा फ्लॉप शो या सामन्यातही पहायला मिळाला. विराट बाद झाल्यानंतर मात्र रोहितने मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, स्टोनिस व अॅडम झम्पा या ऑसी गोलंदाजांची तुफानी धुलाई केली. रोहित शर्माने 41 चेंडूमध्ये 92 धावांचा पाऊस पाडला. रोहितने आपल्या वादळी खेळीमध्ये 8 षटकार आणि सात चौकार ठोकले. रोहित शर्माने स्टार्कच्या एकाच षटकात 4 षटकार ठोकत 29 धावा वसूल करत हवा काढली होती. त्याचे शतक फक्त आठ धावांनी हुकले. क्लार्कनेच त्याला बोल्ड केले. रोहित व रिषभ पंत यांनी 87 धावांची भागीदारी साकारली. पंतला मात्र मोठी खेळी करता आली नाही. 15 धावा काढून बाद झाला.
सूर्यकुमार यादवने 31 धावांची छोटेखानी खेळी केली. त्याने 16 चेंडूमध्ये दोन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 31 धावांचा पाऊस पाडला. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर शिवम दुबेही तंबूत परतला. शिवम दुबे याला चांगली सुरुवात मिळाली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. दुबेने 22 चेंडूमध्ये एक षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने 25 धावांचे योगदान दिले. हार्दिक पंड्याने वादळी फलंदाजी करत फिनिशिंग टच दिला. हार्दिकने 17 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि एक चौकार ठोकला. रवींद्र जडेजाने पाच चेंडूमध्ये 9 धावांचे योगदान दिले, त्यामध्ये एक षटकार ठोकला. रोहित, सुर्या, शिवम यांच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 20 षटकांत 5 बाद 205 धावांचा डोंगर उभा केला.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 5 बाद 205 (रोहित शर्मा 41 चेंडूत 7 चौकार व 8 षटकारासह 92, रिषभ पंत 15, सुर्यकुमार यादव 31, शिवम दुबे 28, हार्दिक पंड्या नाबाद 27, जडेजा नाबाद 9, मिचेल स्टार्क व मार्क स्टोनिस प्रत्येकी दोन बळी).ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 7 बाद 181 (वॉर्नर 6, ट्रेव्हिस हेड 43 चेंडूत 76, मिचेल मार्श 37, मॅक्सवेल 20, टीम डेव्हिड 15, अर्शदीप सिंग 3 तर कुलदीप यादव 2 बळी, बुमराह व अक्षर पटेल प्रत्येकी 1 बळी).
रोहितने पाडला विक्रमांचा पाऊस रोहितचे 19 चेंडूत अर्धशतक
रोहित शर्माने यंदाच्या टी 20 विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम अमेरिकेच्या अॅरोन जोन्सच्या नावावर होता. रोहितने फक्त 19 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. हे टी 20 विश्वचषक 2024 मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.
2024 टी 20 वर्ल्डकपमधील वेगवान अर्धशतक
- रोहित शर्मा - 19 चेंडू
- अॅरान जोन्स - 22 चेंडू
- डिकॉक - 22 चेंडू
टी 20 क्रिकेटमध्ये 200 षटकार
टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 षटकार मारणारा रोहित शर्मा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. या सामन्यापूर्वी रोहितच्या नावावर 195 षटकार होते. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल आठ षटकार लगावले. रोहितनंतर मार्टिन गप्टिलच्या नावावर सर्वाधिक 173 षटकार आहेत.
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज
- रोहित शर्मा - 200 षटकार
- मार्टिन गप्टील - 173 षटकार
- जोस बटलर - 137 षटकार
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात रोहितने 41 चेंडूत 92 धावा केल्या. यासह तो आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. रोहितच्या खात्यावर आता 4165 धावा आहेत.
- रोहित शर्मा - 149 डावांमध्ये 4165 धावा
- बाबर आझम - 116 डावांमध्ये 4145 धावा
- विराट कोहली - 115 डावांमध्ये 4103 धावा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19 हजार धावा
रोहित शर्माने टी20 विश्वचषकात शानदार फटकेबाजी करत 19 हजार धावांचा पल्ला पार केला. यामध्ये वनडे, टी 20 आणि कसोटीचा समावेश आहे. रोहित शर्माआधी भारताकडून विराट कोहली, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांनी 19 हजार धावांचा पल्ला पार केला आहे.
अखेर वचपा काढला
2023 वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. त्याची खंत भारतीयांच्या मनात होतीच. त्याचा बदला टी 20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने घेतला. भारताने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियावर स्पर्धेबाहेर जाण्याचं संकट ओढावले आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केला तर ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात येईल.