टीम इंडिया सलग नवव्यांदा फायनलमध्ये
सामनावीर रेणुका सिंग व राधा यादवचे प्रत्येकी तीन बळी : स्मृती मानधनाचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था/ डाम्बुला (श्रीलंका)
सामनावीर रेणुका सिंगचे (10 धावांत 3 बळी) व स्मृती मानधनाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आशियाच चषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशने दाम्बुलाच्या मैदानावर 81 धावांचे सोपे लक्ष्य भारतासमोर ठेवले होते, जे भारताने एकही विकेट न गमावता 11 षटकांत पूर्ण केले. विशेष म्हणजे, भारतीय संघाने विक्रमी नवव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. आता, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्य फेरीच्या लढतीत जो संघ विजयी होईल तो अंतिम फेरीत भारताविरुद्ध लढणार आहे. दि. 28 रोजी अंतिम सामना होईल.
आशिया चषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रेणुकाने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दिलारा अख्तरला (6) बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर तिने तिसऱ्या व पाचव्या षटकांत इश्मा तंजिम (8) व मुर्शिदा खातून (4) यांना तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी बांगलादेशची 3 बाद 21 अशी स्थिती होती. या तीन धक्क्यांमधून बांगालदेशचा संघ सावरू शकला नाही.
रेणुका सिंगनंतर राधा यादव भारताच्या मदतीला धावून आली. बांगलादेशची कर्णधार निगर सुलताना यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत होती. त्यामुळे भारतासाठी निगारची विकेट मिळवणे सर्वात महत्वाचे होते. राधाने ही जबाबदारी पार पाडली. निगारने सर्वाधिक 2 चौकारासह 32 धावा फटकावल्या. तिला शोरना अख्तरने नाबाद 19 धावा करत चांगली साथ दिली. या दोघींनी सातव्या विकेट्साठी 36 धावांची भागीदारी साकारली. राधा यादवने शेवटच्या षटकात निगार व नहिदा अख्तरला बाद केले. बांगलादेशला 20 षटकांत 8 बाद 80 धावापर्यंत मजल मारता आली. विशेष म्हणजे, रेणुका सिंग, राधा यादव व पूजा वस्त्राकार यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या फलंदाज सपशेल अपयशी ठरल्या. भारताकडून रेणुका सिंग व राधा यादव यांनी सर्वाधिक 3 बळी घेतले तर पूजा वस्त्राकार व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.
स्मृतीचे नाबाद अर्धशतक, शेफालीचीही फटकेबाजी
बांगलादेशने विजयासाठी दिलेले 81 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने 11 षटकांत पूर्ण करत विजय मिळवला. सलामीवीर स्मृती मानधना व शेफाली यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. स्मृतीने 39 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह नाबाद 55 धावा फटकावल्या. शेफालीने 28 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 26 धावा करत तिला चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश महिला संघ - 20 षटकांत 8 बाद 80 (दिलारा अख्तर 6, मुर्शिदा खातून 4, इश्मा तंजिम 8, निगार सुलताना 32, शोरना अख्तर नाबाद 19, राधा यादव व रेणुका सिंग प्रत्येकी तीन बळी).
भारत 11 षटकांत बिनबाद 83 (शेफाली वर्मा 26, स्मृती मानधना नाबाद 55).
टीम इंडिया आठव्या विजेतेपदासाठी सज्ज
महिला आशिया कप स्पर्धा सुरुवातीला एकदिवसीय क्रिकेटच्या स्वरुपात खेळवली जात होती. काही वर्षांपासून ही स्पर्धा टी 20 प्रकारात खेळवली जात आहे. भारताने एकदिवसीय आणि टी 20 असे दोन्ही मिळून 7 वेळा विजेतेपद मिळवले आहे. विशेष म्हणजे, भारताने सलग नवव्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने आतापर्यंत स्पर्धेतील जेतेपदाचे सर्व सामने जिंकले आहेत. तसेच सात वेळा ट्रॉफी जिंकणारा भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. आता, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची नजर आता आठव्या विजेतेपदावर असेल.