टीम इंडिया फायनलमध्ये
उपांत्य फेरीत इंग्लंडवर दणदणीत विजय : उद्या जेतेपदासाठी द.आफ्रिकेबरोबर लढत
वृत्तसंस्था /गयाना
आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला नमवत अंतिम फेरी गाठली आहे. प्रारंभी, कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 7 बाद 171 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना अक्षर पटेल व कुलदीप यादव यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव 103 धावांवर आटोपला. आता, शनिवारी भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
प्रारंभी, गयाना येथील नॅशनल स्टेडियमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बटलरचा हा निर्णय मात्र चुकीचा ठरला. टीम इंडियाच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विराट कोहली 9 धावा काढून बाद झाला. यानंतर रिषभ पंतही अपयशी ठरला. सलामीचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर रोहित व सुर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. रोहितने 57 तर सुर्याने 47 धावा केल्या. यानंतर हार्दिक, जडेजा व अक्षर पटेलने अखेरच्या षटकात फटकेबाजी केल्यामुळे भारताला 7 बाद 171 धावापर्यंत मजल मारता आली.
भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 16.4 षटकांत 103 धावांवर ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून हॅरी ब्रुकने सर्वाधिक 25 धावा केल्या तर कर्णधार जोस बटलरने 23 धावांचे योगदान दिले. आर्चरने 21 तर लिव्हिंगस्टोनने 11 धावा केल्या. हे चौघे वगळता इतर इतर इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजासमोर सपशेल लोटांगण घातले. भारताकडून अक्षर पटेल व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करत विजयात मोलाचे योगदान दिले. बुमराहने दोन बळी घेत त्यांना मोलाची साथ दिली. अक्षर पटेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.