For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाला मिळाला नवा बॉलिंग कोच

06:55 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाला मिळाला नवा बॉलिंग कोच
Advertisement

आफ्रिकेच्या मॉर्नी मॉर्केलकडे जबाबदारी : प्रशिक्षक गंभीरच्या मागणीला बीसीसीआयचा ग्रीन सिग्नल

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई, नवी दिल्ली

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून खेळली जाणारी कसोटी मालिकेपासून मॉर्नी मॉर्केल भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत दिसेल. मॉर्केलचा अनुभव भारतासाठी महत्त्वाचा ठरु शकतो. तथापि, बीसीसीआयकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे, जी लवकरच होण्याची शक्यता आहे.

Advertisement

टीम इंडियात सध्या बरेच बदल पाहायला मिळत आहेत. राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर जवळपास संपूर्ण स्टाफच बदलला आहे. भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून झहीर खान, लक्ष्मीपती बालाजी आणि मॉर्नी मॉर्केलच्या नावाची चर्चा होती. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये गौतम गंभीरसोबत मॉर्पेलने लखनौ सुपर जाएंटस या संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे, यामुळे गौतम गंभीरचे प्राधान्य मॉर्केलच्या नावाला होते. अखेर बीसीसीआयने गौतम गंभीरच्या मागणीनुसार भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्केलच्या नावाला पसंती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पारस म्हांब्रेच्या जागी मॉर्केलला मिळणार संधी

भारताचा माजी वेगवान गोलंदाज पारस म्हांब्रेच्या जागी मॉर्केलला संधी देण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाम्ब्रेने चांगली कामगिरी केली. या वर्षी जूनमध्ये भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्यांचा करार संपुष्टात आला. दरम्यान, मॉर्केलच्या नियुक्तीबाबत बीसीसीआयकडून अधिकृत दुजोरा मिळणे बाकी आहे. दरम्यान, बीसीसीआयने गौतम गंभीरने केलेल्या मागणीनुसार अभिषेक नायरपाठोपाठ मॉर्केलच्या नावाला पसंती दिल्याचे चित्र दिसत आहे.

मॉर्केलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

वयाच्या 33 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हा वेगवान गोलंदाज काउंटी क्रिकेट खेळला आणि त्यानंतर कोचिंगमध्ये हात आजमावला. पाकिस्तानचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याची पहिली मोठी आंतरराष्ट्रीय जबाबदारी होती. भारतात गतवर्षी झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. याशिवाय, कोलकाता नाईट रायडर्समध्ये गंभीर व मॉर्केल यांनी तीन मोसमासाठी ड्रेसिंगरूम शेअर केली आहे. या दोघांनी लखनौ सुपर जायंट्समध्ये एकत्र काम केले होते, जिथे गंभीर मार्गदर्शक होता आणि मॉर्केल गोलंदाजी प्रशिक्षक होता. या मोसमापूर्वी गंभीर केकेआरमध्ये गेल्यानंतरही तो एलएसजीचा गोलंदाजी प्रशिक्षक होता.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेककडून मॉर्केल तब्बल 12 वर्षे क्रिकेट खेळला. आपल्या चमकदार कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेकडून 86 कसोटी, 117 एकदिवसीय आणि 44 टी-20 सामन्यात अनुक्रमे 309, 188 आणि 47 विकेट्स घेतल्या आहेत. मॉर्केलने आपल्या भेदक गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना अचंबित केले आहे.

Advertisement
Tags :

.