टीम इंडियाला 58 कोटींचे बक्षीस
बीसीसीआयची घोषणा : चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघावर कौतुकाचा वर्षाव : आयसीसीपेक्षा तीनपट जास्त रक्कम जाहीर : सपोर्ट स्टाफचाही होणार गौरव
वृत्तसंस्था/मुंबई
अलीकडेच भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 4 विकेट्सने पराभूत केले. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला आयसीसीने 19.50 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने देखील भारतीय संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने पेटारा उघडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम इंडियाला 58 कोटींचे रोख बक्षीस दिले जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हे बक्षीस जाहीर केले आहे. ही रक्कम संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहायक कर्मचारी, निवड समिती, भारतीय पंच यांच्यामध्ये वाटली जाईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी 58 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही बक्षीस रक्कम खेळाडू तसेच प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी, निवड समितीच्या सदस्यांना दिली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आयसीसीकडून मिळणाऱ्या रकमेपेक्षा तीनपट जास्त रकमेचे बक्षीस बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. या 58 कोटीपैकी 3 कोटी प्रत्येक खेळाडूला मिळणार आहेत. 3 कोटी मुख्य प्रशिक्षकांना तर सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 57 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी भारतीय संघाने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यावेळीही बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी आपली तिजोरी उघडली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी बोर्डाने 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ही बक्षिसाची रक्कम सर्व खेळाडू, निवडकर्ते, प्रशिक्षक आणि सपोर्टिंग स्टाफमध्ये वाटण्यात आली होती.