टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये लंकेवर मात
आशिया चषकामध्ये भारताचा सलग सहावा विजय : अभिषेक शर्माची तुफानी खेळी
वृत्तसंस्था/ दुबई
टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील सहाव्या आणि अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेवर मात केली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 203 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात पथुम निसांकाने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर लंकन संघाला 20 ओव्हरमध्ये 202 धावाच करता आल्या. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेला 2 धावांवर झटके देत ऑलआऊट केले. त्यानंतर टीम इंडियाने 3 धावांचं आव्हान हे पहिल्याच बॉलवर पूर्ण केले आणि सलग सहावा विजय मिळवला.
प्रारंभी, श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. भारताची सुरवात मात्र खराब झाली. डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्येच भारताला गिलच्या (4 धावा) रूपात पहिला झटका बसला. त्याला महेश थिक्षणाने बाद केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव या सामन्यात देखील अपयशी ठरला आणि तो 13 चेंडूत 12 धावा काढून बाद झाला.
अभिषेकचे सलग तिसरे अर्धशतक
शुभमन आणि सूर्या बाद झाल्यानंतर अभिषेकने मात्र लंकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या स्पर्धेत सलग तिसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 31 चेंडूचा सामना करत 61 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्याला चारिथ असलंकाने बाद केले. यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने भारताचा डाव सांभाळला. या दरम्यान संजू सॅमसन 39 धावा करून बाद झाला. त्याला दासुन शनाकाने आपली शिकार बनवले. त्यानंतर आलेला हार्दिक पंड्या काही खास करू शकला नाही. तो 2 धावांवर बाद झाला. तिलक वर्माने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने नाबाद 49 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. तर अक्षर पटेलने नाबाद 21 धावांचे योगदान दिले. यामुळे टीम इंडियाला 20 षटकांत 5 बाद 202 धावापर्यंत मजल मारता आली.
निसंकाचे शतक, इतर फलंदाजांची मात्र निराशा
टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 203 धावांचा पाठलाग करताना लंकेची खराब सुरुवात झाली. कुशल मेंडिसला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर पथुम निसंका आणि कुशल परेरा यांनी शतकी भागीदारी साकारली. परेराने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 32 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. तर निसंकाने मात्र शतकी खेळी साकारताना 58 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारासह 107 धावा फटकावल्या. निसंका मैदानात असेपर्यंत लंकन संघ सहज विजय मिळवेल, असे वाटत होते. पण तो बाद झाला अन् सामना फिरला. अखेरीस दसुन शनाकाने 11 चेंडूत 22 धावा केल्या आणि सामना बरोबरी सोडवला आणि पुढे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
यानंतर सुपर ओव्हरमध्ये मात्र लंकन संघाने निराशा केली. त्यांनी 2 गडी गमावत 2 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाने हे पहिल्याच चेंडूत लक्ष्य सहजरित्या पार करत हा सामनाही जिंकला.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 5 बाद 202 (अभिषेक शर्मा 61, तिलक वर्मा नाबाद 49, संजू सॅमसन 39, अक्षर पटेल नाबाद 21, थिक्षप्णा, चमिरा, हसरंगा, शनाका आणि असलंका प्रत्येकी 1 बळी)
श्रीलंका 20 षटकांत 5 बाद 202 (पथूम निसंका 107, कुशल परेरा 58, दसुन शनाका नाबाद 22, हार्दिक पंड्या, अर्शदीप, हर्षित राणा, कुल
अभिषेकचा विक्रमांचा पाऊस
अभिषेक शर्माने 61 धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अभिषेकने या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर नोंदवला आहे. हे त्याचे गेल्या 3 सामन्यातील सलग तिसरं अर्धशतक ठरले. या सामन्यातही त्याच्याकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण तो झेलबाद होऊन माघारी परतला. अभिषेक शर्मा हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागोपाठ 3 अर्धशतक झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी हा पराक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने देखील लागोपाठ 3 सामन्यांमध्ये 3 अर्धशतके झळकावली होती. याशिवाय, अभिषेक शर्माच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने सलग 7 डावात 30 पेक्षा अधिक धावा करण्याच्या बाबतीत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि भारताच्या रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.