टीम इंडिया ‘चॅम्पियन’
फायनलमध्ये न्यूझीलंडवर 4 विकेट्सनी विजय : तब्बल 12 वर्षानंतर जेतेपदाला गवसणी : रोहित शर्माची 76 धावांची खेळी
वृत्तसंस्था / दुबई
कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक, याला भारतीय फिरकीपटूंची मिळालेली उत्तम साथ या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. रविवारी दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 4 विकेट्सनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना किवी संघाला 251 धावा करता आल्या. यानंतर भारतीय संघाने विजयासाठीचे लक्ष्य 49 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. विशेष म्हणजे, भारतीय संघाचे हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद आहे. तसेच तब्बल 12 वर्षानंतर भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने वादळी खेळी करत संघाच्या विजयाच्या पाया रचला. रोहित शर्माने 83 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 76 धावा केल्या, तर शुभमन गिलने 50 चेंडूत एका षटकारासह 31 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला खरा, पण पहिल्याच षटकापासून रोहितने आपले इरादे स्पष्ट केले होते. यावेळी शुभमन गिल हा फक्त रोहितची फटकेबाजी पाहण्याचे काम करत होता. पण डावातील 27 व्या षटकांत रविंद्रच्या गोलंदाजीवर रोहित मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.
श्रेयसचीही धमाकेदार खेळी
श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलच्या भागीदारीने भारताला सामन्यात कायम ठेवले. फॉर्ममध्ये असलेला श्रेयस अय्यर 62 चेंडूत 2 चौकार 2 षटकारांसह 48 धावा करत बाद झाला. तर अक्षर पटेलने मोक्याच्या क्षणी 40 चेंडूत 1 चौकार 1 षटकारासह 29 धावांची खेळी साकारली. अक्षर बाद झाल्यानंतर राहुल (नाबाद 34) आणि हार्दिकने (18) भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. तर रवींद्र जडेजाने विजयी चौकारासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नाणेफेक किवी संघाने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून डावाची सुरुवात करताना रचिन रवींद्र आणि विल यंग या जोडीने संघाला तुफानी सुरुवात दिली आणि पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. किवी संघाने विल यंगच्या रूपात पहिली विकेट गमावली, तर त्यानंतर या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रचिन रवींद्र कुलदीप यादवच्या गुगलीत फसला. यंगला 15 धावांवर वरुण चक्रवर्तीने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर फॉर्ममध्ये असणाऱ्या रचिन रविंद्रने आक्रमक खेळताना 29 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह 37 धावा फटकावल्या. कर्णधार रोहित शर्माने डावातील 11 वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादवकडे चेंडू सोपवला, ज्याने पहिलाच चेंडूवर रॅचिनला क्लीन बोल्ड केले.
डॅरिल मिचेलची संयमी खेळी, ब्रेसवेलचे नाबाद अर्धशतक
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला अनुभवी केन विल्यम्सन स्वस्तात बाद झाला. विल्यम्सनला 11 धावांवर कुलदीपने तंबूचा रस्ता दाखवला. टॉम लॅथमही फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. यावेळी किवी संघाची 4 बाद 108 अशी स्थिती झाली होती. पण, डॅरिल मिचेल व ग्लेन फिलिप्स जोडीने डाव सावरताना पाचव्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी केली. या जोडीने टीम इंडियाच्या फिरकीचा सामना करताना संघाचे दीडशतक फलकावर लावले. ही जोडी धोकादायक ठरेल असे वाटत असतानाच, वरुण चक्रवर्तीने फिलिप्सला 38 व्या षटकांत क्लीनबोल्ड केले. फिलिप्सने 34 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, मिचेलने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 101 चेंडूत 3 चौकारासह सर्वाधिक 63 धावा केल्या. शमीने त्याचा अडथळा दूर केला. मिचेल बाद झाल्यानंतर मायकेल ब्रेसवेलने 40 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारासह नाबाद 53 धावांचे योगदान दिले. अखेरच्या काही षटकांत ब्रेसवेलने केलेल्या या शानदार खेळीमुळे न्यूझीलंडला अडीचशेचा टप्पा गाठता आला. न्यूझीलंडने मिचेल व ब्रेसवेलच्या खेळीच्या जोरावर 50 षटकांत 7 गडी गमावत 251 धावापर्यंत मजल मारली. टीम इंडियाकडून कुलदीप यादव व वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
रोहित-विराटचा विक्रमी धमाका
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडविरुद्ध फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरताच भारतीय कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांनी आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. हे दोन्ही भारतीय खेळाडू सर्वाधिक आयसीसी स्पर्धेची फायनल खेळलेले खेळाडू ठरले आहेत.
सर्वाधिक आयसीसी फायनल खेळलेले फलंदाज
विराट कोहली - 9 फायनल
रोहित शर्मा - 9 फायनल
युवराज सिंग - 8 फायनल
रवींद्र जडेजा - 8 फायनल
महेला जयवर्धने - 7 अंतिम
कुमार संगकारा - 7 फायनल
रोहितचा नाणेफेक गमावण्याचा सिलसिला कायम, लाराच्या विक्रमाशी बरोबरी
अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नशीबाने पुन्हा एकदा नाणेफेकीच्या वेळेस नशीबाने साथ दिली नाही आणि नाणेफेक गमावली. यासह रोहित शर्माने ब्रायन लाराच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात संयुक्तपणे सर्वाधिक नाणेफेक गमावणारा भारतीय कर्णधार बनला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. लाराने वनडे क्रिकेटमध्ये लागोपाठ 12 टॉस गमावले होते.
विराटचा 550 वा आंतरराष्ट्रीय सामना
चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीचा हा 550 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. 550 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. सचिन तेंडुलकर हा भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने एकूण 664 सामने खेळले आहेत.
भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे खेळाडू
- सचिन तेंडुलकर - 664 सामने
- विराट कोहली - 550 सामने
- महेंद्रसिंग धोनी - 538 सामने
- राहुल द्रविड - 509 सामने
- रोहित शर्मा - 499 सामने
ग्लेन फिलिप्सचा अफलातून झेल
भारताविरुद्ध अंतिम लढतीत ग्लेन फिलिप्सने घेतलेला कॅच चर्चेचा विषय ठरला आहे. शुभमन गिलने मारलेल्या जोरदार फटक्यानंतर अशक्य वाटणारा कॅच ग्लेन फिलिप्सने पूर्ण हवेत जात पकडण्याचा पराक्रम केला असून या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. मिचेल सँटनरने 19 व्या षटकात ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकत शुभमन गिलला शॉट खेळायला भाग पाडले. त्यानंतर गिलने चेंडू जोरदार फटकावला पण फिलिप्सने वेगाने आलेला चेंडू एका हातात पकडत अफलातून झेल घेतला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 50 षटकांत 7 बाद 251 (विल यंग 15, रचिन रविंद्र 37, केन विल्यम्सन 11, डॅरिल मिचेल 63, टॉम लॅथम 14, ग्लेन फिलिप्स 34, मायकेल ब्रेसवेल नाबाद 53, सॅटेनर 8, वरुण चक्रवर्ती व कुलदीप यादव प्रत्येकी दोन बळी, मोहम्मद शमी व रविंद्र जडेजा प्रत्येकी एक बळी) भारत 49 षटकांत 6 बाद 254 (रोहित शर्मा 76, शुभमन गिल 31, विराट कोहली 1, श्रेयस अय्यर 48, अक्षर पटेल 29, केएल राहुल नाबाद 34, हार्दिक पंड्या 18, जडेजा नाबाद 9, मायकेल ब्रेसवेल व सँटेनर प्रत्येकी दोन बळी).