For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडविरुद्ध उर्वरित तीन कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

06:45 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडविरुद्ध उर्वरित तीन कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement

विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर : दुखापतीमुळे श्रेयस अय्यरही बाहेर

Advertisement

रवींद्र जडेजा-केएल राहुलची संघात पुन्हा एंट्री : बंगालचा युवा गोलंदाज आकाशदीपला संधी

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बीसीसीआयने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा उर्वरित तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचबरोबर दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला संघातून वगळण्यात आले आहे. याशिवाय, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा संघात परतले आहेत, पण या दोन्ही खेळाडूंना फिटनेसच्या आधारावर प्लेइंग 11 मध्ये संधी दिली जाईल. 27 वर्षांच्या आकाशदीप या नव्या चेहऱ्याची एन्ट्री झाली असून आकाशदीप वेगवान गोलंदाज आहे. उभय संघातील तिसरी कसोटी दि. 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवली जाणार आहे.

केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी दुखापतीच्या कारणास्तव दुसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघ राहुल आणि जडेजाच्या अनुपस्थिती खेळला आणि जिंकला. तिसऱ्या कसोटीसाठी या दोघांच्या उपस्थितीबाबत संभ्रम होता. पण शनिवारी संघ जाहीर झाल्यानंतर या दोघांचे संघात कमबॅक झाले आहे. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांची निवड फिटनेसच्या आधारावर केली जाईल, असे निवड समितीने स्पष्ट केले आहे. याशिवाय, श्रेयस अय्यर मात्र शेवटच्या तिन्ही कसोटींसाठी उपलब्ध नसेल.  पाठीच्या दुखापतीमुळे तो उर्वरित मालिकेला मुकणार आहे. बेंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सध्या त्याच्यावर उपचार चालू आहे. बीसीसीआय त्याच्या सुधारणेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

आकाशदीप नवा चेहरा

27 वर्षीय वेगवान गोलंदाज आकाश दीपने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या तीन सामन्यात 13 विकेट घेतल्या होत्या. बिहारमध्ये जन्मलेला आकाश दीप बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. आकाशने 29 प्रथम श्रेणी सामन्यात 103 बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरसह आकाशदीपने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उर्वरित भारत अ आणि पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व केले आहे. आता, इंग्लंडविरुद्ध मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळते की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सर्फराजला कसोटी पदार्पणाची संधी?

राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ वेगळ्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरेल. श्रेयस अय्यरच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, हे पाहावे लागेल. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने केएल राहुलला खेळण्यासाठी फिट घोषित केले, तर अय्यरच्या जागी राहुल खेळताना दिसेल. पण राहुल फिट नसेल तर युवा सर्फराज खान कसोटी पदार्पण करताना दिसू शकतो. जडेजा फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तर कुलदीप यादव किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागणार आहे. दरम्यान, मोहम्मद सिराजचेही टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. दुसऱ्या कसोटीत त्याला विश्रांती देण्यात आली होती. सिराजचे पुनरागमन झाल्यामुळे आवेश खानला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

तीन कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, के. एल. राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), के. एस. भरत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप.

 विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली इंग्लंडविरुद्ध उर्वरित तीन कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विराट मायदेशातील संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. बीसीसीआय विराट कोहलीच्या निर्णयाचा आदर करते. संघ व्यवस्थापन व बीसीसीआयचा विराटच्या निर्णयाला पाठिंबा आहे. भारताच्या उर्वरीत संघाच्या क्षमतेवर बीसीसीआयचा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.