न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
बुमराहकडे उपकर्णधापदाची धुरा : 16 ऑक्टोबरपासून पहिली कसोटी
वृत्तसंस्था/ मुंबई
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासाठी निवड समितीने 15 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघात कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील 16 खेळाडूंच्या संघातील यश दयाल याला फक्त बाहेर ठेवण्यात आले आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असेलल्या उपकर्णधारपदी जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली आहे.
मायदेशात बांगलादेशला नमवल्यानंतर टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करायचे आहे. न्यूझीलंडचा संघ 16 ऑक्टोबरपासून भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी बीसीसीआयने उपकर्णधारपदी कोणाचीही नियुक्ती केली नव्हती, मात्र आता याबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना बोर्डाने पूर्णविराम दिला आहे. या मालिकेत स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचा उपकर्णधार असेल. निवड समितीचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा एक दिवसापूर्वीच कर्णधार रोहित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अशा स्थितीत त्यांच्या जागी कर्णधारपद कोण घेणार, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. आता फक्त बुमराह ऑस्ट्रेलियात ही जबाबदारी घेऊ शकतो, असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीवीर असतील. यानंतर शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल आणि सरफराज खान या फलंदाजांची टॉप ऑर्डरसाठी निवड करण्यात आली आहे. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव फिरकी विभाग सांभाळतील. तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप वेगवान गोलंदाज म्हणून असणार आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत दीपराह, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.