बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया जाहीर
रोहितकडे नेतृत्वाची धुरा, बुमराह उपकर्णधार : मोहम्मद शमीला स्थान नाहीच
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे, जिथे संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. शुक्रवारी बीसीसीआयने 18 सदस्यीय संघाची घोषणा करताना रोहित शर्माकडे नेतृत्वाची धुरा सोपवली असून जसप्रीत बुमराह उपकर्णधार असेल. याशिवाय अभिमन्यू ईश्वरन, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी या युवा खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. उभय संघातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना दि. 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे.
टीम इंडियाचा गेल्या काही वर्षात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत दबदबा राहिला आहे. गेल्या दोन्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर प्रतिष्ठेची मालिका जिंकली आहे. विशेष म्हणजे, टीम इंडियासाठी 2020-2021 हा दौरा अविस्मरणीय ठरला होता. मालिकेत पिछाडीवर असताना भारताने जोरदार कमबॅक करत सीरिज जिंकली होती. आता, न्यूझीलंडविरुद्ध मालिका संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवण्यात येणार असून ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फारनलसाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे.
रोहितकडे नेतृत्व
बीसीसीआयने अनुभवी रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा कायम ठेवली आहे. दुसरीकडे अभिमन्यु ईश्वरन, नीतीश रेड्डी आणि हर्षित राणा या युवा खेळाडूंना लॉटरी लागली आहे. दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्याकडे निवड समितीने दूर्लक्ष केले आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा यांच्याकडे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. तर रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर तीन स्पिनर खेळवले आहेत. याशिवाय, केएल राहुलवर निवड समितीने विश्वास दाखवत त्याला संधी दिली आहे.
शमी, कुलदीपला स्थान नाही
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व फिरकीपटू कुलदीप यादव यांना संघात स्थान मिळालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही दुखापतीने त्रस्त असून यातून पूर्णपणे सावरलेले नाहीत. शमीबाबत बीसीसीआयने कोणतेही अपडेट दिलेले नाहीत. शार्दुल ठाकूरलाही भारतीय संघात स्थान मिळवता आलेले नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी , वॉशिंग्टन सुंदर.
राखीव - मुकेश कुमार, नवदीप सैनी व खलील अहमद.