टीम इंडियाचा कोरियावरही विजय
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : सलग चार विजयासह भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये : हरमनप्रीतचे दोन गोल
वृत्तसंस्था/हुलुनबुईर (चीन)
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने विजयाचा चौकार लगावला. गुरुवारी झालेल्या सामन्यात हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण कोरियाला 3-1 असे पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कर्णधार हरमनप्रीतने दोन गोल करत विजयात मोलाचे योगदान दिले. आता, दि. 14 रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा शेवटचा साखळी सामना होईल. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतीय संघ सध्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झाला आहे. जपान, मलेशिया व चीनला नमवल्यानंतर गुरुवारी झालेल्या दक्षिण कोरियाविरुद्ध लढतीतही टीम इंडियाने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या भारतीय संघाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. सामन्यातील आठव्या मिनिटाला अराजित सिंगने शानदार गोल केला.
यानंतर पाठोपाठ कर्णधार हरमनप्रीतने नवव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला 2-0 असे आघाडीवर नेले. पहिल्या सत्रात भारतीय संघ आघाडीवर होता, दुसऱ्या सत्रात मात्र एकही गोल करता आला नाही. याउलट 30 व्या मिनिटाला जिहुन यांगने गोल करत भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली. तिसऱ्या सत्रात दोन्ही संघाकडून गोल करण्यासाठी प्रयत्न झाले. कोरियन संघाला 35 व 36 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. यानंतर कर्णधार हरमनप्रीतने 43 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला व भारताला 3-1 असे आघाडीवर नेले. चौथ्या सत्रात भारतीय संघ बचावात्मक प्रयत्नात दिसला. कोरियन संघाला गोल करण्यासाठी संधी मिळाल्या पण भारताच्या भक्कम बचावासमोर त्यांना गोल करता आला नाही. अखेरीस टीम इंडियाने हा सामना 3-1 असा जिंकला व थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला.
मलेशिया, पाकिस्तानचाही शानदार विजय
गुरुवारी स्पर्धेतील अन्य सामन्यात मलेशिया व पाकिस्तानने शानदार विजयाची नोंद केली. मलेशियाने जपानवर 5-4 असा निसटता विजय मिळविला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात एकेका गोलसाठी चांगलाच संघर्ष पहायला मिळाला. याशिवाय, पाकिस्तानने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी चीनचा 5-1 असा धुव्वा उडवला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पाकने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले.
हरमनप्रीतचे 200 आंतरराष्ट्रीय गोल
भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या दोन गोलसह त्याने आपल्या कारकिर्दीतील 200 गोल पूर्ण केले. आता, हरमनप्रीतच्या खात्यावर 201 गोल आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षी दमदार फॉर्ममध्ये असणारा हरमनप्रीतने टीम इंडियाच्या अनेक विजयात मोलाचे योगदान दिले आहे. या माईलस्टोनसाठी हॉकी इंडियाने त्याचे विशेष अभिनंदन केले आहे.
टीम इंडियाच गुणतालिकेत अव्वल
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. 4 सामन्यात 4 विजयासह 12 गुण आहेत. पाकिस्तान 5 गुणासह दुसऱ्या तर दक्षिण कोरियाही 5 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. मलेशिया 4 गुणासह चौथ्या, चीन 3 गुणासह पाचव्या तर जपान अखेरच्या स्थानी आहे. या स्पर्धेचा उपांत्य सामना 16 सप्टेंबर रोजी तर अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.
शनिवारी भारत-पाक आमनेसामने
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत सहा संघ सहभागी झाले आहेत. राऊंड रॉबिननुसार प्रत्येक संघ एकमेकाविरुद्ध सामना खेळत आहे. टीम इंडियाने आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात धमाकेदार विजय मिळवला आहे. आता, दि. 14 रोजी भारतीय संघ आपला अखेरचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघ ऑलिम्पिकनंतर प्रथमच आमनेसामने येत असल्याने ही लढत नक्कीच हायव्होल्टेज होण्याची शक्यता आहे.