For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडिया ऑलआऊट 471

06:58 AM Jun 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडिया ऑलआऊट 471
Advertisement

 दुसऱ्या दिवशी अवघ्या 41 धावांत 7 विकेट्स : पंतचेही शतक, गिलचे दीडशतक हुकले : बेन स्टोक्स, टंगचे 4 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ 471 धावांत ऑलआऊट झाला. भारताकडून यशस्वी जैस्वाल (101), शुभमन गिल (147) आणि ऋषभ पंत (134) यांनी शानदार शतके झळकावली. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. विशेष म्हणजे, टीम इंडियाने शेवटचे 7 बळी अवघ्या 41 धावांत गमावले. दमदार सुरुवातीनंतरही मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 24 षटकांत 1 गडी गमावत 107 धावा केल्या होत्या. बेन डकेट 53 तर ओली पोप 48 धावांवर खेळत होते.

Advertisement

दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 3 बाद 359 धावसंख्येवरून खेळायला सुरुवात केला. ऋषभ पंतने दमदार शैलीत फलंदाजी करताना आपले सातवे कसोटी शतक पूर्ण केले. पंतने इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना 178 चेंडूत 12 चौकार व 6 षटकारासह 134 धावा फटकावल्या. याच वेळी शुभमन गिल 150 धावा काढण्यापासून हुकला, त्याला 147 धावांवर शोएब बशीरने आऊट केले. त्याने 227 चेंडूचा सामना करताना 19 चौकार व 1 षटकार लगावला. या दोघांनी द्विशतकी भागीदारी साकारली. गिल बाद झाल्यानंतर पंतही फारकाळ मैदानात टिकला नाही. त्याला टंगने परतीचा रस्ता दाखवला. त्यानंतर, क्रिजवर आलेल्या 6 फलंदाजांपैकी फक्त एकच खेळाडू धावांच्या बाबतीत दुहेरी आकडा गाठू शकला.

41 धावांत 7 विकेट्स

टीम इंडियाने एकवेळ 3 गडी गमावत 430 धावा केल्या होत्या. यानंतर मात्र भारतीय संघाने उर्वरित 7 विकेट अवघ्या 41 धावांत गमावल्या. 8 वर्षांनी संघात परतलेला करुण नायर खातेही उघडू शकला नाही. शेवटच्या 6 फलंदाजांपैकी फक्त रवींद्र जडेजा 10 धावांचा टप्पा गाठू शकला. अष्टपैलू खेळाडू म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झालेला शार्दुल ठाकूरही फक्त 1 धाव काढून बाद झाला. रवींद्र जडेजाला केवळ 11 धावा करता आल्या. मधल्या फळीतील फलंदाजांनी सपशेल निराशा केल्याने भारतीय संघाचा 113 षटकांत 471 धावांवर पहिला डाव संपुष्टात आला. बेन स्टोक्स आणि जोश टंगने प्रत्येकी चार विकेट घेतल्या. त्याच वेळी, ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

इंग्लंडची सावध सुरुवात

टीम इंडियाला 471 धावांत ऑलआऊट केल्यानंतर फलंदाजी करताना इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का बसला. सलामीवीर क्रॉलीला बुमराहने 4 धावांवर आऊट केले. यानंतर मात्र ओली पोप व बेन डकेट यांनी चहापानापर्यंत पडझड होऊ दिली नाही. डकेटने अर्धशतक झळकवताना 8 चौकारासह 53 धावांची खेळी साकारली तर पोपने त्याला चांगली साथ देताना 48 धावा फटकावल्या. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 24 षटकांत 1 गडी गमावत 107 धावा केल्या होत्या,.

संक्षिप्त धावफलक (चहापानापर्यंत)

भारत 113 षटकांत सर्वबाद 471 (यशस्वी जैस्वाल 101, केएल राहुल 42, शुभमन गिल 227 चेंडूत 19 चौकार व 1 षटकारासह 147, ऋषभ पंत 178 चेंडूत 12 चौकार व 6 षटकारासह 134, जडेजा 11, जोश टंग 86 धावांत 4 बळी, बेन स्टोक्स 66 धावांत 4 बळी, शोएब बशीर 1 बळी)

इंग्लंड 24 षटकांत 1 बाद 107 (जॅक क्रॉली 4, बेन डकेट खेळत आहे 53, ओली पोप खेळत आहे 48, बुमराह 1 बळी).

शतकानंतर पंतचे अनोखे सेलिब्रेशन, धोनीलाही टाकले मागे

  1. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने शानदार शतकी खेळी खेळली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 7 वे शतक आणि इंग्लंडविरुद्ध चौथे शतक होते. त्याने इंग्लंडच्या भूमीवर तिसरे शतक झळकावले आहे. पंत आता भारतासाठी सर्वाधिक शतके (7) करणारा विकेटकीपर फलंदाज बनला आहे. त्याने महेंद्रसिंग धोनी (6 शतके) चा विक्रम मोडला आहे. ऋद्धिमान साहा (3 शतके) तिसऱ्या स्थानावर आहे.
  2. पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी केली आणि 146 चेंडूत शतक पूर्ण केले. 99 धावांवर असताना कोणतही दडपण न घेता, त्याने पुढे सरसावत षटकार ठोकत शतक पूर्ण केले. पंतने शतक साजरे करताना मैदानात कोलांटी उडी मारली. चेहऱ्यावरची जिद्द, आत्मविश्वास आणि समाधान स्पष्टपणे झळकत होतं. ड्रेसिंग रूममधून टीममधील सहकाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत उभं राहून त्याचा गौरव केला.

Advertisement
Tags :

.