टीम इंडिया सर्वबाद 445, साहेबांचेही जोरदार प्रत्युत्तर
राजकोट येथील तिसरी कसोटी : बेन डकेटचे नाबाद शतक : दुसऱ्या दिवसअखेरीस इंग्लंडच्या 2 बाद 207
वृत्तसंस्था/ राजकोट
इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत बॅझबॉलची झलक दाखवत 445 धावा करणाऱ्या टीम इंडियाला चांगलीच धडकी भरवली आहे. राजकोट येथील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 2 बाद 207 धावा केल्या आहेत. अवघ्या 210 चेंडूत त्यांनी 207 धावा केल्या आहेत, हे विशेष. इंग्लिश संघ अद्याप 238 धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लिश सलामीवीर बेन डकेटने आक्रमक शतकी खेळी केली. दिवसअखेरीस तो 133 धावांवर नाबाद होता तर जो रुट 9 धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाचा पहिला डाव 445 धावांवर संपुष्टात आला.
सुरुवातीला भारतीय संघाने 5 बाद 326 धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पण अवघ्या 5 धावांची भर घातल्यानंतर कुलदीप यादव जिमी अँडरसनचा बळी ठरला. यानंतर पुढील षटकांत शतकवीर जडेजाला रुटने तंबूचा रस्ता दाखवला. जडेजाने 112 धावांचे योगदान दिले. जडेजा परतल्यानंतर पदार्पणवीर ध्रुव जुरेल व आर अश्विन यांनी संघाला चारशेपर्यंत मजल मारुन दिली. या जोडीने आठव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी साकारली. ही जमलेली जोडी रेहान अहमदने तोडली. त्याने अश्विनला 37 धावांवर बाद केले. यानंतर अहमदनेच 46 धावांवर जुरेलचा बळी घेतला. युवा पदार्पणवीर जुरेलने 104 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारासह 46 धावांचे योगदान दिले. यानंतर बुमराहने 28 चेंडूत 26 धावांची वेगवान खेळी साकारली. बुमराहला वूडने पायचीत करत टीम इंडियाचा डाव संपुषत आणला. भारतीय संघाने 130.5 षटकांत सर्वबाद 445 धावा केल्या. इंग्लंडकडून मार्क वूडने 4 तर रेहान अहमदने 2 बळी घेतले. जेम्स अँडरसन, टॉम हार्टले आणि जो रूट यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
बेन डकेटचे आक्रमक शतक
टीम इंडियाला जोरदार प्रत्युत्तर देताना इंग्लिश संघाने देखील आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर जॅक क्रॉली व बेन डकेट यांनी 89 धावांची सलामी दिली. यात डकेटने आक्रमक खेळताना भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 13 व्या षटकांत अश्विनने क्रॉलीला बाद करत ही जोडी फोडली. याशिवाय कसोटी क्रिकेटमधील आपला 500 बळींचा टप्पाही पूर्ण केला.
क्रॉली बाद झाल्यानंतर डकेट व ओली पोप यांनी संघाचा डाव पुढे नेला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. डकेट राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. अवघ्या 88 चेंडूत त्याने कारकिर्दीतील तिसरे कसोटी शतक ठोकले. हे एखाद्या इंग्लिश फलंदाजाने भारताविरुद्ध केलेले सर्वात वेगवान कसोटी शतक ठरले. डकेटने या शतकासाठी 19 चौकार आणि एक षटकार मारला. दरम्यान, ओली पोपला सिराजने बाद केले. पोपने 39 धावांचे योगदान दिले. पोप बाद झाल्यानंतर डकेटने मात्र आपला आक्रमक खेळ सुरुच ठेवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 35 षटकांत 2 बाद 207 धावा केल्या होत्या. डकेट 118 चेंडूत 133 तर जो रुट 9 धावांवर खेळत होता. भारताकडून अश्विनने 1 तर सिराजने 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक : भारत पहिला डाव सर्वबाद 445 (रोहित शर्मा 131, जडेजा 112, सर्फराज खान 62, ध्रुव जुरेल 46, आर अश्विन 37, बुमराह 26, वूड 114 धावांत 4 बळी, रेहान अहमद 2 बळी).
इंग्लंड पहिला डाव 35 षटकांत 2 बाद 207 (जॅक क्रॉली 15, बेन डकेट नाबाद 133, ओली पोप 39, जो रुट खेळत आहे 9, अश्विन व सिराज प्रत्येकी एक बळी).
आर. अश्विन @ 500
भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ऐतिहासिक अशी कामगिरी साकारली आहे. अश्विनने इंग्लिश सलामीवीर जॅक क्रॉलीला बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स पूर्ण केल्या. अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा जगातील नववा क्रिकेटपटू ठरला आहे. याचबरोबर तो भारताचा दुसरा आणि एकूण पाचवा फिरकी गोलंदाज आहे. भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेने 619 विकेट घेतल्या आहेत. या यादीत अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे.
विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान 500 विकेट घेणारा अश्विन हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने अवघ्या 98 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली. कसोटीमध्ये सर्वात वेगवान 500 विकेट घेण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीधरनने अवघ्या 87 कसोटी सामन्यात 500 विकेटचा टप्पा पूर्ण केला होता. भारताच्या अनिल कुंबळेने 105 सामन्यात तर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने 108 कसोटी सामन्यात हा विक्रम केला होता. यासह अश्विनने वेगवान 500 विकेट घेण्याच्या शर्यतीत अनिल कुंबळे आणि शेन वॉर्नला मागे टाकले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारे गोलंदाज
- मुरलीधरन (श्रीलंका) - 800 बळी
- शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - 708 बळी
- जेम्स अँडरसन (इंग्लंड) - 696 बळी
- अनिल कुंबळे (भारत) - 619 बळी
- स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) - 604 बळी
- मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) - 563 बळी
- कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) - 519 बळी
- नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) - 517 बळी
- आर.अश्विन (भारत) - 500 बळी.