टीम इंडिया ऑलआऊट 185
सिडनीत वेगवान गोलंदाजांची दहशत, पहिल्याच दिवशी 11 बळी : कांगारुंच्या 1 बाद 9 धावा, 176 धावांनी पिछाडीवर
वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये जे घडत होते, तेच काहीसे सिडनी कसोटीच्या पहिल्या डावातही पहायला मिळाले. सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया 185 धावांवर ऑलआऊट झाली. विशेष म्हणजे, रोहित शर्माला खराब फॉर्मचे कारण देत संघातून वगळण्यात आले पण तरीही संघाच्या फलंदाजीत सुधारणा झाली नाही. भारताकडून यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (40) सर्वात मोठी खेळी खेळली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने एक गडी गमावत 9 धावा केल्या होत्या. कांगारुंचा संघ अद्याप 176 धावांनी पिछाडीवर आहे.
सिडनी कसोटीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. डावातील पाचव्याच षटकात मिचेल स्टार्कने केएल राहुलला आऊट केले. त्याला केवळ 4 धावा करता आल्या. यानंतर स्कॉट बोलंडने यशस्वी जैस्वालला (10 धावा) आणि विराटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कोहलीही 17 धावा करून बाद झाला. त्याआधी शुभमन गिल अतिशय खराब शॉट खेळून लंचच्या आधी आऊट झाला. गिलने लायनच्या चेंडूवर पुढे येत शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण स्लीपमध्ये तो झेलबाद झाला. त्यालाही केवळ 20 धावा करता आल्या.
ऋषभ पंतच्या सर्वाधिक 40 धावा
72 धावांत चार विकेट पडल्यानंतर पंत आणि जडेजाने संघाची धुरा सांभाळली. दोघांनीही बराच वेळ फलंदाजी केली. पंतच्या अंगावर अनेक चेंडू लागले आणि तरीही तो क्रीजवरच राहिला पण शेवटी बोलंडच्या चेंडूवर त्याची विकेट पडली. पंतने 98 चेंडूचा सामना करताना 3 चौकार व 1 षटकारासह 40 धावा केल्या. चौथ्या कसोटीतील शतकवीर नितीश कुमार रे•ाr यावेळी पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. त्यानंतर स्टार्कने वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजाला बाद करून टीम इंडियाला आणखी अडचणीत आणले. सुंदरने 14 तर जडेजाने 26 धावांचे योगदान दिले. प्रसिद्ध कृष्णालाही केवळ 3 धावा करता आल्या. पण शेवटी जसप्रीत बुमराहने 22 धावांची खेळी करत टीम इंडियाला 185 धावांपर्यंत पोहोचवले. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने 4, तर मिचेल स्टार्कने 3 बळी घेतले.
ख्वाजाची विकेट अन् कांगारुंच्या 1 बाद 9 धावा
टीम इंडिया ऑलआऊट झाल्यनांतर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला. उस्मान ख्वाजा आणि सॅम कॉन्स्टास यांनी डावाची सुरुवात केली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर कॉन्स्टन्सने बुमराहवर चौकार ठोकला. त्यानंतर तिसऱ्या षटकांत बुमराहने दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर ख्वाजाला बाद करून टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. ख्वाजा 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 3 षटकांत 1 बाद 9 धावा केल्या होत्या. कॉन्स्टास 7 धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 72.2 षटकांत सर्वबाद 185 (यशस्वी जैस्वाल 10, केएल राहुल 4, शुभमन गिल 20, विराट कोहली 17, ऋषभ पंत 40, रवींद्र जडेजा 26, बुमराह 22, स्कॉट बोलँड 4 बळी, मिचेल स्टार्क 3 तर पॅट कमिन्स 2 बळी).
ऑस्ट्रेलिया 3 षटकांत 1 बाद 9 (उस्मान ख्वाजा 2, कॉन्स्टास खेळत आहे 7, बुमराह 1 बळी).
कॉन्स्टास बुमराहला भिडला
जसप्रीत बुमराह हा शांत व संयमी खेळाडू म्हणून ओळखला जातो. मैदानावर त्याला क्वचितच कोणत्याही फलंदाजावर ओरडताना पाहिले असेल, पण सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी बुमराह जरा वेगळ्याच अंदाजात दिसला. 19 वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू सॅम कॉन्स्टास भारताविरुद्धच्या मालिकेत पदार्पण केल्यापासूनच चर्चेत आहे. सिडनीत कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने बुमराहशी पंगा घेतला आणि त्याची किंमत उस्मान ख्वाजाला मोजावी लागली. बुमराह आणि कॉन्स्टन्स यांच्यातल्या वादाची घटना ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या तिसऱ्या षटकात घडली. बुमराहने ख्वाजाला चेंडू खेळण्यासाठी लवकर तयार होण्यास सांगितले पण तेव्हा नॉन स्ट्रायकरवर उभ्या असलेल्या कॉन्स्टान्सने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या दिशेने जात असताना अंपायरने मध्ये येऊन त्यांना थांबवले. यानंतर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर बुमराहने ख्वाजाची विकेट घेतली. या विकेटनंतर बुमराह थेट कॉन्स्टान्स समोर जाऊन उभा राहिला. दरम्यान, स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीसह टीम इंडियातील सर्व खेळाडूंनी त्याच्या समोरुन जात विकेटचे सेलिब्रेशन केले.
सिडनी कसोटीतून रोहितची माघार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनीत खेळला जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात स्वत:हून विश्रांती घेतली असल्याची माहिती जसप्रीत बुमराहने माहिती दिली. 37 वर्षीय रोहित शर्मा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने खराब फॉर्ममुळे स्वत: विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय त्याने प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांना कळवला आहे. रोहितच्या या निर्णयानंतर मात्र भारतीय क्रिकेटमध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे.
बुमराह नाणेफेकीच्या वेळी म्हणाला, ‘रोहितने या सामन्यात विश्रांती घेणे पसंत केले आहे. यावरून संघातील एकजूट दिसून येते आणि संघ सकारात्मक आणि विजयाबद्दल विचार करत असल्याचे दिसून येते. आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. कारण मागील काही सामन्यात आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. रोहितच्या जागी शुभमन गिल आणि जखमी आकाश दीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळाली आहे.
मागील काही काळापासून रोहितचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरला आहे. मायदेशातील न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नव्हत्या तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतही त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर रोहितवर टीकेचा भडिमार केला जात आहे. याशिवाय, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारतीय संघ पोहोचण्याच्या आशा जर तर वर अवलंबून आहेत. यामुळे सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्त झाला तर मेलबर्न कसोटी ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी असेल, असेही बोलले जात आहे.
क्रिकेटच्या इतिहासातील चौथी घटना
एखादी मालिका सुरु असताना दुखापतीशिवाय खराब कामगिरीमुळे कर्णधार प्लेईंग 11 चा भाग नसणे हे क्रिकेटच्या इतिहासात भलेही नवे नसेल, पण टीम इंडियात याआधी असे कधीच घडलेले नाही. कसोटी मालिकेदरम्यान याआधी मिसबाह उल हकने कर्णधार असताना (पाकिस्तान, 2014) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यातून स्वत: विश्राती घेण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर शाहिद आफ्रिदीने कर्णधारपद स्वीकारले होते. 2014 मध्ये श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल उपांत्य आणि अंतिम सामन्यासह टी 20 विश्वचषकाच्या शेवटच्या तीन सामन्यांमधून बाहेर राहिला होता, त्यावेळी लसिथ मलिंगाने कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारली होती. इंग्लडच्या माईक डेनिसनेही 1974 मध्ये जॉन एडरिचकडे कर्णधारपद सोपवून अॅशेसच्या चौथ्या कसोटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतरच्या सामन्यांमध्ये डेनिसने संघाचे नेतृत्व केले होते. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात रोहित शर्माच्या बाबतीत असे घडले आहे.