बदलत्या टेक्नॉलॉजीसोबत शिक्षकांनीही अपडेट व्हावे
प्रकाश पाटील यांचे प्रतिपादन : लोकमान्य सोसायटीतर्फे शिक्षक विकास कार्यशाळा
प्रतिनिधी/ बेळगाव
सध्या तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. त्यामुळे आजचे विद्यार्थी हे शिक्षकांपेक्षा अधिक अपडेट असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिक्षकांनीही आता त्यांच्याच पद्धतीने अपडेट राहणे गरजेचे आहे. एआय टेक्नॉलॉजीमुळे शिक्षण विभागात भविष्यात अनेक बदल होणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा विश्वास जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील मार्गदर्शक प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे व लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आरपीडी कॉलेज परिसरात शिक्षकांसाठी विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर लोकमान्य को-ऑप. सोसायटीचे उपाध्यक्ष पंढरी परब, शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी एस. एस. हिरेमठ, जीएसएस कॉलेजचे प्राचार्य अभय सामंत, खानापूर येथील व्ही. वाय. चव्हाण डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिरीश केरूर, पुणे येथील मार्गदर्शक प्रज्ञा पुजारी, लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे समन्वयक डॉ. डी. एन. मिसाळे, लोकमान्य सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी सत्यव्रत नाईक यासह इतर उपस्थित होते.
पंढरी परब म्हणाले, लोकमान्य सोसायटी यापूर्वी बँकिंग, विमा, रियल इस्टेट, समाजप्रबोधन, सांस्कृतिक चळवळ यासह इतर विभागांमध्ये कार्यरत होती. आता शिक्षण विभागातही लोकमान्य सोसायटीने पाऊल ठेवले आहे. सावंतवाडी येथील माई इन्स्टिट्यूट सोबतच खानापूर येथील व्ही. वाय. चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेजही सुरू करण्यात आले आहे. विज्ञान व गणित शिक्षकांना नवीन कौशल्ये आत्मसात करता यावीत, यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दोन दिवस चालणाऱ्या कार्यशाळेमध्ये बेळगाव व खानापूर तालुक्यातील विज्ञान व गणित शिक्षक सहभागी झाले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चतर्फे त्यांना अनेक नवीन तंत्रज्ञानाची तसेच कौशल्यांची माहिती दिली जाणार असल्याचे डॉ. डी. एन. मिसाळे यांनी सांगितले. प्रा. डॉ. शिरीश केरूर यांनी खानापूर येथील व्ही. वाय. चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेजविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यव्रत नाईक यांनी केले.