Satara News : करंजखोपमध्ये शिक्षकांच्या वारंवार दांड्या ; संतप्त ग्रामस्थांनी शाळेला ठोकलं टाळं!
शिक्षकांच्या हलगर्जीपणावर करंजखोप ग्रामस्थांचा संताप
सातारा : सातारा जिल्ह्यातील करंजखोप (ता. सातारा) येथे शिक्षकांच्या वारंवार गैरहजेरीमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज ‘शारदाबाई गोविंदराव पवार ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स’ शाळेला टाळं ठोकत तीव्र आंदोलन केलं. शाळेतील काही शिक्षक सातत्याने अनुपस्थित राहत असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण अक्षरशः रामभरोसे सुरू असल्याचा आरोप पालक व ग्रामस्थांनी केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक वेळेवर न येणे, वारंवार शाळा बुडवणे आणि शिक्षणात झालेली मोठी घसरण यावर काही ग्रामस्थांनी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नव्हती. या दुर्लक्षामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी अखेर शाळेच्या गेटला टाळं लावून निदर्शनं केली.
या आंदोलनात पालक, विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत "शिक्षक हजर करा – शाळा सुरु करा", "दांड्या मारणारे शिक्षक हाकला" अशा जोरदार घोषणा दिल्या.
या प्रकरणी शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, जर कारवाई झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे.