शिक्षक बदली कौन्सिलिंग आजपासून
बी. के. मॉडेल शाळेमध्ये आयोजन
बेळगाव : मागील अनेक दिवसांपासूनची शिक्षकांची प्रतीक्षा अखेर पूर्ण झाली आहे. गुरुवार दि. 11 पासून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील शिक्षक बदली कौन्सिलिंगला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची बदली होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
बदलीसाठी शिक्षकांची अनेक दिवसांपासून धडपड सुरू होती. तीन ते चार वेळा कौन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. परंतु या ना त्या कारणाने ते रद्द करण्यात येत होते. यामुळे बदलीची प्रक्रिया रखडली होती. दोन दिवसांपूर्वी शिक्षण विभागाकडून नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. टप्प्याटप्प्याने शैक्षणिक जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील कौन्सिलिंग होणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी गट शिक्षणाधिकारी विभाग तसेच जिल्हा स्तरावर अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये काहीसा बदल केल्यानंतर अंतिम यादी जाहीर करण्यात आली. यादीच्या आधारे गुरुवार दि. 11 पासून कौन्सिलिंगला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लवकरच शिक्षकांची बदली प्रक्रिया घेतली जाणार आहे.
शिक्षकांमध्ये उत्सुकता
कॅम्प येथील बी. के. मॉडेल शाळेच्या कॅम्पसमध्ये कौन्सिलिंगची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी दुपारनंतर कौन्सिलिंगचा डेमो अधिकाऱ्यांनी घेतला. गुरुवारी टप्प्याटप्प्याने या ठिकाणी कौन्सिलिंग घेतले जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये उत्सुकता असून कोणत्या ठिकाणी बदली मिळते हे पहावे लागणार आहे.