शिक्षक बदली कौन्सिलिंगला प्रारंभ
पहिल्या दिवशी 160 शिक्षकांना संधी
बेळगाव : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गुरुवारपासून शिक्षक बदली कौन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवात झाली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील शिक्षकांची कौन्सिलिंग प्रक्रिया कॅम्प येथील बी. के. मॉडेल शाळेच्या सभागृहामध्ये झाली. यामुळे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक या परिसरात कुटुंबीयांसमवेत आले होते. शिक्षक बदली प्रक्रिया अनेक कारणांनी रखडली होती. दोन दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने नवे वेळापत्रक जाहीर करून अखेर बदली कौन्सिलिंगला सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले. बेळगावच्या बी. के. मॉडेल शाळेच्या सभागृहात कौन्सिलिंग प्रक्रिया घेण्याचे निश्चित करण्यात आले. गुरुवारी सकाळपासूनच या ठिकाणी शिक्षकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी अतिरिक्त शिक्षकांसाठी कौन्सिलिंग घेण्यात आले. 160 शिक्षकांना संधी देण्यात आली. शाळांची यादी दाखवून त्या-त्या ठिकाणी त्यांना बदली देण्यात आली. त्यामुळे शिक्षकांमधून समाधानाचे वातावरण दिसून आले. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया सुरू ठेवली जाणार आहे.