कार पलटी होऊन शिक्षक ठार
सिद्धापूर तालुक्यातील दुर्घटना : पाच शिक्षक जखमी
कारवार : इको वाहन पलटी होऊन एक शिक्षक ठार तर अन्य पाच शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सिद्धापूर तालुक्यातील हजीनी येथे घडली. ठार झालेल्या शिक्षकाचे नाव मंजुनाथ आण्णाप्पा देवाडीग असे आहे. ते भटकळ तालुक्यातील बैलूर येथील शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून सेवा बजावीत होते. अपघातात जखमी झालेल्या शिक्षकांची नावे संदेश शेट्टी, नारायण मोगेर, चन्नवीरप्पा होसमनी, सादिक शेख व महेश नाईक अशी आहेत. जखमी शिक्षकांवर पहिल्यांदा सिद्धापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले. दावणगिरी येथील चित्रकला ग्रेड परीक्षेच्या मूल्यमापन कार्यासाठी हे सर्व शिक्षक कारमधून होन्नावर येथून मावीनगुंडी (ता. सिद्धापूर) मार्गे निघाले होते. एका अवघड वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्ड्यात पलटी झाले. त्यामुळे देवाडीग ठार झाले तर अन्य पाच शिक्षक गंभीर जखमी झाले. सिद्धापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.