For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरात शिक्षक पात्रता परीक्षा सुरळीत

10:53 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरात शिक्षक पात्रता परीक्षा सुरळीत
Advertisement

एकूण 41 केंद्रांवर टीईटी : सकाळच्या सत्रात पहिला तर दुपारच्या सत्रात दुसरा पेपर

Advertisement

बेळगाव : भावी शिक्षक होण्यासाठी महत्त्वाची असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी बेळगावसह परिसरात सुरळीतपणे पार पडली. सकाळच्या सत्रात पहिला तर दुपारच्या सत्रात दुसरा पेपर झाला. बेळगाव जिल्ह्यातील एकूण 41 केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात 18,459 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. शहरातील परीक्षा केंद्रांवर रविवारी सकाळपासूनच परीक्षार्थी व त्यांच्या पालकांची गर्दी झाली होती. विशेषत: महिला परीक्षार्थींना आपल्या लहान मुलांना परीक्षा केंद्राबाहेर नातेवाईकांकडे ठेवून परीक्षा द्यावी लागली. कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी प्रत्येक परीक्षार्थीची तपासणी करण्यात आली.

डिजिटल घड्याळ तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांना परीक्षा केंद्रांमध्ये घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला. तसेच परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पहिल्या पेपरसाठी 7,263 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केला होता. तर दुसऱ्या पेपरसाठी 11,196 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केला होता. पहिली ते चौथीसाठी सकाळच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. तर पाचवी ते आठवीसाठी दुपारच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. यामुळे साप्ताहिक सुटी असतानाही रविवारी शाळा व महाविद्यालय परिसर गर्दीने फुलले. जिल्हाभरातील विद्यार्थ्यांना सरकारी तसेच खासगी वाहने पकडून शहरातील परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचताना तारेवरची कसरत करावी लागली.

Advertisement

पेपरफुटीचा धसका

नीट परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण सध्या गाजत असल्याने टीईटी परीक्षेत कुठेही असे प्रकार होऊ नयेत, यासाठी पहिल्यांदाच वेबलिंक कॅमेऱ्यांचा प्रयोग करण्यात आला. दहावी, बारावी परीक्षेप्रमाणेच वेबलिंक कॅमेरे प्रत्येक वर्गात बसविले होते. यामुळे अधिकारीवर्गाला कोणत्याही वर्गातील माहिती त्वरित उपलब्ध होत होती. तसेच पेपर संपताक्षणी उत्तरपत्रिका जमा करून त्या विद्यार्थ्यांसमोरच मोहोरबंद करण्यात आल्या. नीट पेपरफुटीचा राज्य सरकारने धसका घेऊन या उपाययोजना केल्याची चर्चा परीक्षार्थींमध्ये होती.

Advertisement
Tags :

.