शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
पोलीस हेडक्वॉर्टर्सनजीकच्या शाळेतील प्रकार
बेळगाव : दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना पोलीस हेडक्वॉर्टर्सनजीकच्या एका सरकारी प्राथमिक शाळेत घडली आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी संबंधित शाळेतील शिक्षिकेला याबद्दल धारेवर धरत जाब विचारला. दुसरीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी (श्रुती आणि अनिकेत-नावे बदलली आहेत) हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी शाळेला गेले होते. त्यावेळी वर्गात शिक्षिकेने त्यांना प्रश्न विचारला. त्या विषयाचे उत्तर देता आले नाही म्हणून याच कारणातून दोघांना या शिक्षिकेने बेदम मारहाण केली. मारहाण केलेल्या विद्यार्थ्यांच्या गालावर, हातावर आणि पायावर काळे-निळे व्रण उठले आहेत.
रजा नाकारल्याने रागाच्या भरात विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची चर्चा
हा प्रकार विद्यार्थ्यांच्या पालकांच्या निदर्शनास येताच शनिवारी संतप्त पालक त्या शिक्षिकेला जाब विचारण्यासाठी शाळेत गेले होते. परंतु, शिक्षिका रजेवर असल्याचे शाळा व्यवस्थापनाने पालकांना सांगितले. पण अशाप्रकारे बेदम मारहाण करण्यात आल्याने पालकांनी शिक्षिकेला धारेवर धरत जाब विचारला. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षिकेने रजेचीही मागणी केली होती. पण रजा नाकारण्यात आल्याने याच कारणातून तिने रागाच्या भरात विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे बोलले जात आहे.
संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणी
एकीकडे सरकारी शाळातील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत चालल्याने शाळा धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असतानाच दुसरीकडे शिक्षकाकडून अशाप्रकारे विद्यार्थ्यांना वागणूक दिली जात असल्याने पालकवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.