शिक्षक बँक नोकर भरती वादाच्या भोवऱ्यात
सांगली :
ज्या बँकेत नोकर भरती करावयाची आहे. त्या बँकेचे नाव न टाकता नोकर भरतीची प्रक्रिया राबवल्याने संबंधित भरती प्रक्रिया संशय व वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यांच्या विरोधात राज्यातून अनेक सभासदांनी सहकार आयुक्त पुणे, सहकार मंत्री, सहकार सचिव मुंबई यांच्याकडे तक्रारींचा ससेमिरा लावला असल्याची माहिती बँकेचे माजी अध्यक्ष यु. टी जाधव यांनी दिली. ते म्हणाले, संबंधित एजन्सी मार्फतच पारदर्शी कारभाराच्या नावाखाली मिरवणाऱ्या सांगली जिल्हा शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी नोकर भरतीचा फंडा अवलंबला होता. त्यास बैंक बचाव कृती समितीच्या माध्यमातून सहकार आयुक्त, सहकार सचिव, सहकार मंत्री यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केल्याने बँकेचे नाव न टाकता नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरू केलेली भरती प्रक्रिया स्थगित केली आहे. सदर एजन्सी राज्यात अनेक बँकात गैरपद्धतीने भरती प्रक्रिया राबवत असल्याचे उघड होत चालल्याने संबंधित एजन्सीची सहकार आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू आहे. लवकरच सुनावणी होणार आहे. काही बँकांचे संचालक मंडळ एजन्सीच्या आड दडून आपले उखळ पांढरे करून घेण्याच्या प्रयत्नात होते. शिक्षक बँकेतील सत्ताधारी संचालक मंडळींचा धंदा यानिमित्ताने उघड झाला आहे. भरती प्रक्रियेस आम्ही सखोल पुराव्यानिशी विरोध केला आहे. सदर एजन्सीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बँक बचाव कृती समितीच्या वतीने शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष यु टी जाधव, जगन्नाथ कोळपे, सतिश पाटील, संचालक सचिन खरमाटे व कृष्णा पोळ पाठपुरावा करीत आहेत.