तेदेपचा उमेदवार ठरला सर्वाधिक श्रीमंत
चंद्रशेखर यांच्याकडे 5785 कोटी रुपयांची संपत्ती
वृत्तसंस्था/ अमरावती
आंध्रप्रदेशच्या गुंटूर मतदारसंघातील तेलगू देसम पक्षाचे उमेदवार पी. चंद्रशेखर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 5 हजार 785 कोटी रुपयांच्या कौटुंबिक संपत्तीची घोषणा केली आहे. चंद्रशेखर हे डॉक्टर, उद्योजक आणि राजकारणी आहेत. चंद्रशेखर या लोकसभा निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरू शकतात.
चंद्रशेखर यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची स्वत:ची संपत्ती 2448.82 कोटी, पत्नी श्रीरत्ना कोनेरू यांची संपत्ती 2343.78 कोटी तर मुलांची संपत्ती सुमारे 1 हजार कोटी रुपयांची आहे. चंद्रशेखर यांच्या कुटुंबावर अमेरिकेच्या जे. पी. मॉर्गन चेस बँकेचे 1138 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
यापूर्वी असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात छिंदवाडातील काँग्रेस उमेदवार आणि कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ हे सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचे म्हटले हेते. नकुलनाथ यांच्याकडे 717 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
अमेरिकेत उच्चशिक्षण
चंद्रशेखर हे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी सिनाई हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. 1999 मध्ये त्यांनी विजयवाडा येथील एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्समधून एमबीबीएस पूर्ण केले होते. 2005 साली पेन्सिल्व्हेनियाच्या डेनविल येथील जीसिंगर मेडिकल सेंटरमधून त्यांनी एमडीचे शिक्षण पूर्ण केले. चंद्रशेखर हे आंध्रप्रदेशच्या बरीपालेम गावचे रहिवासी आहेत.