12,380 कोटींनी टीसीएस नफ्यात
तिसऱ्या तिमाहीतील आकडेवारी सादर : कंपनीचे समभाग 6 टक्क्यांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील दिग्गज आयटी कंपनी टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टीसीएस) यांच्याकडून तिमाहीमधील नफा कमाईची आकडेवारी नुकतीच सादर करण्यात आली आहे. यामध्ये टीसीएसचा ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत निव्वळ नफा 3.95 टक्क्यांनी वधारुन तो 12,380 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
शुक्रवारच्या सत्रात या निकालाचा परिणाम समभागावर दिसला. तिमाही निकालामुळे बाजारात 6 टक्क्यांनी समभाग तेजीत राहिले होते. या अगोदर जुलै ते सप्टेंबर तिमाहीत हा आकडा 11,909 कोटी रुपयांवर राहिला होता. वार्षिक सरासरीत निव्वळ नफा हा 12 टक्क्यांनी मजबूत राहिला आहे.
दरम्यान कंपनीच्या उत्पन्नात घसरण दिसून आली. ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत ही घसरण 63,973 कोटी रुपयांवर राहिली. या अगोदरच्या तिमाहीत हा आकडा 64,259 कोटी होता. समभागधारकांना प्रति समभाग 10 रुपये अंतरिम लाभांश आणि 66 रुपयाचा विशेष लाभांश देणार असल्याची घोषणाही कंपनीने केली आहे.