टीसीएसला 12,760 कोटीचा नफा
एप्रिल-जून 2025 तिमाहीचे निकाल जाहीर : 63,437 कोटीचा महसूल
वृत्तसंस्था/बेंगळूर
आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसने एप्रिल ते जून 2025 या तिमाहीचा निकाल घोषित केला असून या कालावधीत कंपनीने 12,760 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मार्च 2025 च्या तिमाहीपेक्षा निव्वळ नफा 4 टक्के आणि जून 2024 च्या तुलनेत 6 टक्के इतका वाढला आहे. पण महसुलात मात्र तिमाही आधारावर 1.6 टक्के इतकी घट दिसली आहे. कंपनीने गुरुवारी संध्याकाळी निकाल घोषित केला आहे. एप्रिल ते जून 2025 या कालावधीत कंपनीने 63,437 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मार्च 2025 अखेरच्या तिमाहीत कंपनीने 64,479 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला होता. एक वर्षापूर्वी समान अवधीत कंपनीने 62,613 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला होता.
लाभांशाची घोषणा
याचदरम्यान कंपनीने अंतरिम लाभांशाची घोषणाही केली आहे. याअंतर्गत समभागधारकांना 1 रुपयांच्या फेस व्हॅल्युच्या प्रति समभागावर 11 रुपये (1100 टक्के) अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली गेली आहे. यासाठीची रेकॉर्ड तारीख 16 जुलै 2025 ही असणार आहे.
पहिली आयटी कंपनी
एप्रिल ते जून दरम्यानचा तिमाही निकाल घोषित करणारी टीसीएस ही पहिली आयटी कंपनी आहे. प्रतिस्पर्धी कंपनी एचसीएल टेक पुढील आठवड्यात नफ्याचा निकाल जाहीर करणार आहे. इन्फोसिस यानंतरच्या आठवड्यात नफ्याचा निकाल घोषित करेल, असे सांगितले जात आहे. टीसीएसचे समभाग निकाल घोषित होण्यापूर्वी शेअरबाजारात बीएसईवर 0.1 टक्के घसरणीसोबत बंद झाले होते.