पेडणेत टॅक्सीचालकांचा संप
पेडणे : जोपर्यंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पेडणेत येऊन आम्हाला ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा निर्धार जाहीर करुन पेडणेतील टॅक्सी व्यावसायिकांनी काल गुरुवारी दिवसभर पेडणेत मोर्चा काढून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सकाळी 10.30 वा. श्री भगवती देवीला श्रीफळ ठेवून व साकडे घालून या आंदोलनाला सुऊवात झाली होती, सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलन सुरुच होते. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेडण्यातील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायविरोधात पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो, अॅड. अमित सावंत, काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर, संजय बर्डे, दीपेश नाईक, रामा काणकोणकर, रामा वारंग, निखिल महाले, योगेश गोवेकर, आनंद गावकर, तारा केरकर, शंकर पोळजी, देवेंद्र प्रभूदेसाई, दीपक कळंगुटकर, धर्मेश सगलानी, गोवा टॅक्सीचालक संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत, पदाधिकारी बाप्पा कोरगावकर, राजन कोरगावकर, चांदेल - हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस, इब्रामपूरचे सरपंच अशोक धावसकर पेडणे पालिकेचे नगराध्यक्ष शिवराम तुकोजी, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, नगरसेवक विष्णू साळगावकर, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, वारखंडचे उपसरपंच, वसंत नाईक, माजी सरपंच गौरी जोसलकर, माजी सरपंच निशा हळदणकर, उपसरपंच सिद्धी गडेकर, रमेश सावळ, सूर्यकांत तोरस्कर आदी विविध क्षेत्रातील नेते उपस्थित होते.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर तसेच पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. स्वत:चीही भूमिका त्यांच्यासमोर स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्त्यांनी आपला हट्ट सोडला नाही.दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त करत हा विषय आपण केंद्र सरकारकडे पोचवणार असल्याचे सांगितले.
मोठा पोलीस फौजफाटा
पेडण्याचे पोलीस अधीक्षक जिवबा दळवी, पेडणे निरीक्षक सचिन लोकरे, मोपा पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर, निरीक्षक शरीफ जाकीस, निरीक्षक गावकर, तसेच वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक विश्वजीत चोडणकर आधी तैनात होते. काल गुऊवारचा आठवडा बाजार असल्याने काही प्रमाणात नागरिकांना या आंदोलनाचा त्रास सहन करावा लागला. सरकारी संकुलाच्या गेटजवळ पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी टॅक्सीचालक त्यांच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले मात्र पोलिसांनी त्यांना गेटजवळ अडवले. त्यामुळे वातावरण काही प्रमाणात तंग झाले.