करवसुलीला प्राधान्य द्यावे
जि. पं. सीईओ राहुल शिंदे : पूर्वतयारी बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : करवसुलीसाठी मोबाईल टॉवर, औद्योगिक केंद्रे व इतर सर्व खासगी स्रोतांतून येत्या पंधरा दिवसांपर्यंत 50 टक्के प्रगती साधली पाहिजे. ‘सकाल’ योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या अर्जांची आगामी तीन दिवसात छाननी करावी. ग्राम पंचायत क्षेत्रात वॉर्ड सभा, सर्वसाधारण सभा व इतर काही सभा ऑनलाईनद्वारे घेण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिकद्वारे हजेरी सक्तीची करण्यात यावी. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत देण्यासाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी केल्या. ग्रामीण विकास व पंचायतराज तसेच माहिती-तंत्रज्ञान, जैविक तंत्रज्ञान मंत्र्यांच्या अध्यक्षतेत 3 डिसेंबर रोजी बेळगावात विकास आढावा बैठक होणार आहे. त्या निमित्ताने गुरुवार दि. 28 रोजी सीईओ राहुल शिंदे यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची पूर्वतयारी बैठक घेऊन सूचना केल्या.
डिजिटल ग्रंथालयाशी संबंधित जिल्ह्यात एकूण 500 पैकी 486 ग्राम पंचायती सरकारतर्फे मंजुरी मिळवून कार्य करीत आहेत. 480 डिजिटल ग्रंथालयांचे परिवर्तन करण्यात आले आहे. उर्वरित 6 ग्राम पंचायतींना नवीन इमारत उपलब्ध झाल्यानंतर डिजिटल ग्रंथालयाची सोय करावी, डिसेंबरअखेर सर्व तालुक्यांमध्ये मनरेगामध्ये 85 टक्के प्रगती झाली पाहिजे. त्या अनुषंगाने 2021-22 ते 23-24 या काळात प्रगतिपथावरील कामे, शाळांना संरक्षक भिंत, स्वयंपाक खोली, स्वच्छतागृह, क्रीडांगण, कचरा डेपो या कामांना प्राधान्य देण्यात यावे. ‘हर घर जल ग्राम’ घोषणेखाली कार्यकारी अभियंते, साहाय्यक कार्यकारी अभियंते तसेच सर्व तालुकास्तरावरील कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियम पाळून कार्य करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
क्षारपड जमिनींच्या विकासासाठी 21 गावांची निवड करण्यात आली असून निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करावी. अद्याप सुरू न केलेल्या पाळणाघरांसाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने काम हाती घ्यावे, अशाही सूचना त्यांनी केल्या. जिल्हा पंचायतीचे उपसचिव (विकास) बसवराज अडवीमठ यांनी पंधराव्या वित्त योजनेसंबंधी माहिती दिली. ऑनलाईन आणि पासबुक यांच्याशी जुळवाजुळव करून कामानुसार वेतन देण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी केली. जि. पं.चे योजना संचालक रवी बंगप्पन्नावर, उपसचिव बसवराज हेग्गनायक, मुख्य लेखापाल परशुराम दुडगुंटी, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना, कार्यकारी अभियंता शशिकांत नायक यासह केआयडीएल विभाग बेळगाव, चिकोडीचे कार्यकारी अभियंता तसेच सर्व तालुक्यांचे कार्यकारी अधिकारी पूर्वतयारी बैठकीला उपस्थित होते.