साप्ताहिक सुटी दिवशीही करवसुली मोहीम
मनपाचा महसूल उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न
बेळगाव : शहरात करवसुलीची मोहीम जोरदारपणे सुरू करण्यात आली आहे. थकबाकीदारांना नोटिसा देऊन त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. शनिवार, रविवारची साप्ताहिक सुटी असतानाही महसूल विभागाकडून करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे मागील दोन दिवसात शहरातील अनेक मिळकतींची वसुली करण्यात आली आहे. रविवारी सकाळी विविध विभागातील महसूल निरीक्षक आणि साहाय्यक महसूल निरीक्षक रहिवासी तसेच दुकानदारांना करवसुलीच्या नोटिसा वेळेत कर भरला नाही तर टाळे ठोकण्याचा इशाराही मिळकती धारकांना देण्यात आला आहे.
महापालिका आयुक्तांनी नुकतीच एक ऑनलाईन बैठक घेऊन करवसुली सक्तीची करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या नेतृत्वाखाली साप्ताहिक सुटी दिवशीही करवसुली केली जात आहे. करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नसल्याने नुकत्याच झालेल्या विकास आढावा बैठकीत लवकरात लवकर करवसुली पूर्ण केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार रविवारी शहराच्या उत्तर व दक्षिण विभागात करवसुलीची मोहीम राबविण्यात आली. खडेबाजारसह महांतेशनगर, रविवारपेठ, शिवबसवनगर, नेहरुनगर, मार्केट यार्ड परिसरात थकबाकीदारांना नोटिसा देण्यात आल्या. तसेच कर भरण्याच्या सूचना देण्यात आल्या.