कोल्हापूरची ओळखच बनून गेलेले ‘तावडे हॉटेल’
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
देशात ट्रकचा, लक्झरीचा, बसचा ड्रायव्हर कोणीही असो. त्याला मराठी कळत असो किंवा नसो. पण त्याला तावडे हॉटेल माहित नाही, असं कधीच घडले नाही किंवा पॅसेंजर तावडे हॉटेलला उतरणार, असं म्हणून बसले असेल तर ड्रायव्हरला तावडे हॉटेल कोठे आहे? हे कधी विचारावे लागल नाही. कारण कोल्हापूरच्या शिवेवरचं तावडे हॉटेल ही प्रत्येकाच्या मनात ठासून बसलेली कोल्हापूरची एक खूण आहे. काळाच्या ओघात गेली 20 वर्षे झाली तावडे हॉटेल आता त्याच्या जागेवर नाही. त्यांचे कोणतेही अस्तित्व त्या ठिकाणी नाही. पण तावडे हॉटेल म्हणूनच आजही या परिसराची ओळख ताजीतवानी आहे आणि कोल्हापुरातला प्रस्तावित उड्डाणपुलाचा आराखडा तावडे हॉटेल ते पंचगंगा शिवाजी पूल याच नावाने आखला जात आहे.
पुणे-बेंगळूर महामार्गावर शिरोली जकात नाक्याचे वळण आणि गांधीनगर वळीवडेकडे जाण्राया रस्त्याच्या कोपऱ्यावर हे तावडे हॉटेल होते. हॉटेल कसले? एक छोटीशी कौलारू टपरीच होती. हॉटेल साधारण 1940 सालातले. त्यावेळी वाहतूक फार मोठी होती, असे नाही. पण पुणे-बंगळूर महामार्गावर दिवसरात्र नित्य वाहतूक चालूच होती. अशावेळी तावडे हॉटेल आले म्हणजे कोल्हापूर आले, हे ड्रायव्हरला किंवा प्रवाशांना सांगावेच लागले नाही. कोल्हापुरात न येता बाहेरूनच अन्य ठिकाणी जाणाऱ्यांना तावडे हॉटेलजवळ थांबले की पुढच्या प्रवासासाठी दुसरे वाहन हमखास मिळत होते. त्यामुळे तावडे हॉटेलच्या बाकड्यावर कायम लोक थांबलेले असायचे. रात्री-अपरात्री थांबलेल्या अनेकांना आधार देत राहायचे.
या हॉटेलला चहा, बिस्कीट पुडा व सकाळी-संध्याकाळी मिरचीभजी मिळायची. दारात पाण्याचा माठ ठेवलेला असायचा. सेलवर चालणारा ट्रांझिस्टर रेडिओ कायम चालू असायचा. शंकर कदम ऊर्फ तावडे यांचे सारे कुटुंबच हे हॉटेल चालवायचे. हॉटेलात चहा कप-बशीतून दिला जायचा. हॉटेलला लाईट नव्हती. त्यामुळे रात्री कंदीलाच्या प्रकाशाचा आधार रात्री अकरापर्यंत घेतला जायचा. त्यानंतर हॉटेल बंद व्हायचे. पण रात्री-अपरात्री या मार्गावर येणाऱ्या पांथस्थासाठी हॉटेलच्या दारात बसायला बाकडे ठेवलेले असायचे.
याशिवाय त्या काळात वळीवडे येथे पोलंडचे निर्वासित राहत होते. त्यांची वसाहतच वळीवडे येथे होती. त्यांच्यासाठी येणारे साहित्य तावडे हॉटेलसमोर उतरले जायचे. तेथून ते बैलगाडीने वळीवडे येथे नेले जायचे. कारण त्यावेळी वाळिवडेकडे जाणारा रस्ता पक्का नव्हता. या परिस्थितीत तावडे हॉटेलचा हा कोपरा कधीच मोकळा नसायचा आणि कदम परिवार त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा.
2005 साली महापुरात तावडे हॉटेल पहिल्यांदा पूर्ण पाण्यात बुडाले. त्यानंतर या रस्त्याचे विस्तारीकरण सुरू झाले आणि त्याचा फटका तावडे हॉटेलला बसला. हॉटेलची जागा विस्तारीकरणात गेली. हा परिसर नव्या-नव्या बांधकामाने गजबजून गेला. अनेक नवीन झगमगीत हॉटेल्स या परिसरात सुरू झाली. त्यातल्या एका हॉटेलने आपल्या हॉटेलच्या नावाने या परिसराची ओळख व्हावी म्हणून खूप प्रयत्न केला. पण तावडे हॉटेल या नावाचा पगडा इतका की, आजही त्या जागेवर हॉटेल किंवा त्याचे कसलेही अस्तित्व नसताना तावडे हॉटेल म्हणूनच या परिसरावर शिक्का कायम बसला.
आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उड्डाण पुलाला तत्वत: मान्यता दिली आहे आणि तावडे हॉटेल ते शिवाजी पूल असेच याच नावाने या उड्डाणपूलाचा आराखडा केला जाणार आहे. त्यामुळ sतावडे हॉटेल हे नाव आणि एक ओळख पुढेही कायम राहणार आहे.
तावडे हॉटेल चालवणारे कदम कुटुंबीय उचगावमध्ये राहतात. ते सर्वजण अन्य व्यवसाय व नोकरीत आहेत.