तवडकर, कामत यांचा आज शपथविधी
आलेक्स सिक्वेरांचा मंत्रीपदाचा राजीनामा : रमेश तवडकर आज सोडणार सभापतीपद
पणजी : अखेर कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सादर केला आहे, तर सभापती रमेश तवडकर हे आज गुरुवारी सकाळी सभापतीपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर आजच दुपारी राज्य मंत्रीमंडळाची पुनर्रचना होईल. त्यात दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांचा शपथविधी राजभवनवर होणार आहे. गेली पावणेदोन वर्षे राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना प्रलंबित होती. अखेर सरकारला गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 च्या आत मुहूर्त मिळाला असून माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत तसेच काणकोणचे आमदार व मावळते सभापती रमेश तवडकर यांची दुपारी 12 वाजता होणाऱ्या समारंभात मंत्रिमंडळात वर्णी लागेल.
दुपारी 12 वाजता शपथविधी
नवी दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे काल बुधवारी रात्री उशिरा दिल्लीहून गोव्यात परतले. नूतन राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हे नव्या मंत्र्यांना राजभवनच्या दरबार हॉलमध्ये दुपारी 12 वाजता शपथ देतील. नव्या मंत्र्यांना मुख्यमंत्री कोणती खाती देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यास दोन महिने झाले. तेव्हापासून मंत्रिमंडळात एक पद रिक्त होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गावडे यांच्याकडील क्रीडा व युवा व्यवहार तसेच कला व संस्कृती इत्यादी महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळीत आहेत. आता अन्य मंत्र्यांच्या खात्यांचीही पुनर्रचना होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मात्र या संदर्भात मौन पाळले आहे. मात्र सर्वच मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांना आता संधी प्राप्त झाली आहे. मात्र तसा निर्णय ते घेतील का? याबाबत शंका आहे.
ठरल्याप्रमाणे पुनर्रचना : नाईक
प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी मंत्रिमंडळाची पुनर्रचना गणेश चतुर्थीपूर्वी केली जाईल, असे जे जाहीर केले होते त्याप्रमाणे पुढील आठवड्यात गणेश चतुर्थी असल्याने तत्पूर्वी ही पुनर्रचना केली जात असल्याचे म्हटले आहे. पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर चर्चा करून दोन आमदारांची नावे निश्चित केली. त्यानुसार गुरुवारी शपथग्रहण सोहळा होईल, असे सांगितले.
पक्षाचा निर्णय शिरोधार्ह : लोबो
या पुनर्रचनेत मायकल लोबो यांचे नाव का नाही ? याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटले. मायकल लोबो हे उत्तर गोव्यातील भाजपचे लोकप्रिय नेते आहेत. मात्र त्यांचे नाव या यादीत घेतले नाही. यावरून सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. मायकल लोबो यांनी यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. पक्षाचा निर्णय शिरोधार्ह मानू असे ते म्हणाले.
आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा नाही : आलेक्स
कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आपले राजीनामा पत्र सादर केले. मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते ते रात्री उशिरा परतले. त्यांनी सिक्वेरांचे राजीनामापत्र राज्यापालांना संमतीसाठी पाठविले. पत्रकारांशी बोलताना आलेक्स सिक्वेरा म्हणाले की, आपण आरोग्याच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. आपले काही वैयक्तिक कारण आहे, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. आपण राजीनामा दिला तरी त्यासाठी कोणालाच दोष देत नाही. आपण भाजपचाच आमदार म्हणून पुढे काम करीत रहाणार असेही ते म्हणाले. आपण काही दिवसांपूर्वी राजीनामा देण्याच्या विचारात होतो. परंतु कुठेतरी थांबायला हवे या उद्देशाने आता राजीनामा दिलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.
पक्षाने दिलेली नवी जबाबदारी स्वीकारतो : तवडकर
सभापती रमेश तवडकर यांनी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत आपण आज सभापतीपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आपल्याला सभापतीपदी रहायचे होते. आपण जेव्हा हे पद स्वीकारले त्याचवेळी आपण या पदाची गरीमा खाली जाणार नाही, याची दक्षता घेऊन व तसे वागेन असे म्हटले होते. त्याचप्रमाणे आपण वागलो. प्रत्यक्षात आपल्याला हे पद सोडायचे नव्हते. मात्र पक्षाला माझ्या कार्याची गरज आहे. सभापती या नात्याने आपल्याला पक्षाचे संघटनात्मक काम करता आले नाही. आता मंत्री झाल्यानंतर आपण हे काम करू शकतो. यामुळेच आपण आज सकाळी सभापतीपदाचा राजीनामा देत असून त्यानंतर दुपारी 12 वाजता राजभवनवर जाऊन शपथग्रहण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पक्षाने दिलेली जबाबदारी आपण स्वीकारत आहे. म्हणूनच हे पद सोडून मंत्रीपदाचा स्वीकार करीत असल्याचे सभापती रमेश तवडकर म्हणाले.
गणेश गावकर नवे सभापती ?
नवे सभापती म्हणून सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांची निवड केली जाणार आहे. सध्या त्यांचे नाव चर्चेत घेतले जात आहे. मंत्रीपद नसल्याने ते नाराज असल्याने सभापतीपद देऊन त्यांचा मान लाखला जाणार आहे. त्यामुळे एसटी समाजाला पुन्हा एकदा दोन मोठी पदे प्राप्त होतील. मंत्री गावडे यांची खाती रमेश तवडकर यांना दिली जाणार आहेत. एसटी खातेही त्यांच्याकडेच सोपविले जाण्याची दाट शक्यता आहे.
आमदार गणेश गावकर पुढील महिन्यात सभापती
नवे सभापती म्हणून सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांची निवड पुढील महिन्यात केली जाणार आहे. त्यासाठी गोवा विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलाविले जाईल. त्याचबरोबर केंद्र सरकारने संसदेत संमत केलेल्या गोव्यातील आदिवासींना विधानसभेत राखीवता मिळवून देणारा कायदा सादर केला जाईल. त्यासाठी केंद्र सरकारचे अभिनंदन करणारा ठराव विधानसभेत संमत केला जाईल. हे अधिवेशन सप्टेंबरमध्ये घेतले जाईल. ही निवड बहुदा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

