शरीराच्या 98 टक्के हिस्स्यांवर टॅटू
सध्या टॅटू काढून घेणे सामान्य बाब ठरले आहे. परंतु जगात काही लोक केवळ टॅटूसाठीच ओळखले जातात. याचपैकी एक महिला ऑस्ट्रेलियात राहते. तिच्या शरीरावर इतके टॅटू आहेत की, टॅटूशिवाय असलेला भागच दिसत नाही. तिने या छंदापोटी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत.
एम्बर ल्यूकला टॅटूचा छंद अत्यंत कमी वयापासून जडलेला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी तिने पहिला टॅटू काढून घेतला होता, आता ती ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक टॅटू असलेली महिला ठरली आहे. आता 30 वर्षीय एम्बरच्या शरीराचा जवळपास 98 टक्के हिस्सा टॅटूंनी झाकोळला गेला आहे. यात सुंदर कॅलिग्राफी, पोर्टेट्स, प्रतीक चिन्ह आणि अनोख्या डिझाइन्स सामील आहेत. तिची ही शारीरिक कला लोकांचे लक्ष वेधून घेण्यासह तिच्या लुकचीही सगळीकडे चर्चा होत असते.
एम्बरने स्वत:च्या लुकवर आतापर्यंत 1.77 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली आहे. अनेक टॅटू आर्टिस्ट्सनी तिला निशुल्क सेवाही पुरविली आहे, तर तिने खर्च केलेल्या रकमेत प्लास्टिक सर्जरी, बॉडी मॉडिफिकेशन, डर्मल पियर्सिंग, हेड हॉर्न इम्प्लांट आणि टंग स्प्लिटिंग यासारख्या प्रक्रियाही सामील आहेत. एम्बरची सर्वात जोखिमयुक्त प्रक्रिया डोळ्यांमध्ये निळ्या शाईचे इंजेक्शन होते. या ऑपरेशननंतर ती 3 आठवड्यांपर्यंत अंध झाली होती, तरीही तिने हार न मानता पुन्हा हीच प्रक्रिया करविली.
आत्मविश्वास कायम
तिचा लुक प्रत्येकाला पसंत पडत नाही, परंतु एम्बर टीकांनी प्रभावित होत नाही. काही दिवस मानसिक स्वरुपात मजबूत होते, तर काही दिवस कमजोर परंतु प्रत्येकासाठी सौंदर्याची व्याख्या वेगळी असते, हे आठवणीत ठेवले जावे. समाजाच्या ट्रेंड्समागे पळण्याऐवजी स्वत:ची पसंत अन् छंदाचा पाठलाग करावा, असा सल्ला एम्बरने दिला आहे.