टाटा टी लवकरच चहाचे दर वाढविणार
पुढील काही महिन्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांची माहिती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
चहा पिणाऱ्या ग्राहकांसाठी आता चटका देणारी बातमी आहे. टाटा टी कंपनी येत्या काही महिन्यांत आपल्या विविध ब्रँडच्या चहाच्या किंमती वाढवणार आहे. किमत वाढवून कंपनीचा नफा मार्जिन वाढवण्याचा मानस आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने या संदर्भात ही माहिती दिली आहे.
बाजारात 28 टक्के हिस्सेदारी
कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील डिसोझा यांनी सांगितले की, कंपनीने एकूण मागणीत वाढीची अपेक्षा केली आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत महसुलात कंपनीने 11 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. तसेच नफ्यात एक टक्के वाढ नोंदवणाऱ्या कंपनीचा असा विश्वास आहे की पुरवठा खंडित झाल्यामुळे चहाच्या किमती यावर्षी 25 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. देशातील चहाच्या किरकोळ बाजारपेठेत टाटा टीची बाजारातील हिस्सेदारी 28 टक्के आहे आणि या श्रेणीत हिंदुस्थान युनिव्हर्सिटीशी स्पर्धा करते.
उत्पादनात घट
चहाच्या किमतीत झालेल्या वाढीबाबत स्पष्टीकरण देताना डिसोझा म्हणाले की, एकूण चहा उत्पादनात 20 टक्क्यांनी घट झाली आहे आणि त्याशिवाय निर्यातही वाढली आहे. याव्यतिरिक्त, चहा मंडळाने नेहमीच्या डिसेंबरच्या मध्याऐवजी नोव्हेंबरच्या शेवटी चहाची पाने तोडणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पुरवठ्यावर अधिक परिणाम होणार आहे.