‘टाटा स्टील मास्टर्स’ विजेत्या प्रज्ञानंदचे चेन्नईत जोरदार स्वागत
‘टाटा स्टील मास्टर्स’ विजेत्या प्रज्ञानंदचे चेन्नईत जोरदार स्वागत
वृत्तसंस्था/ चेन्नई
नेदरलँड्समधील विज्क अॅन झी येथील टाटा स्टील मास्टर्स 2025 मध्ये यशाची संस्मरणीय कहाणी लिहिल्यानंतर ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंद यांचे चेन्नईमध्ये जोरदार स्वागत झाले. नाट्यापूर्ण अंतिम सामन्यात प्रज्ञानंदने डी. गुकेशला जागतिक विजेता बनल्यानंतरचा पहिला पराभव पत्करायला लावून रोमांचक पद्धतीने प्रतिष्ठित विजेतेपद पटकावले.
तामिळनाडूच्या क्रीडा विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी चेन्नई विमानतळावर प्रज्ञानंदचे स्वागत केले. प्रज्ञानंदने यावेळी विजेतेपदापर्यंतच्या प्रवासावर भाष्य करताना कबूल केले की, त्याच्या स्पर्धकांच्या आणि सहकाऱ्यांच्या अलीकडच्या यशाने त्याला अधिक मेहनत करण्याची आणि चांगले खेळण्याची प्रेरणा दिली. ‘2024 चा शेवट माझ्यासाठी फारसा चांगला झाला नाही. म्हणून मी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. या वर्षाची सुऊवात इतकी चांगली झाली याचा मला आनंद आहे. गुकेशनेही चांगला खेळ केला. हा एक रोमांचक टायब्रेकर होता. गुकेशने जागतिक अजिंक्यपद जिंकणे किंवा अर्जुन एरिगेसीने 2800 चा स्तर (क्लासिकल बुद्धिबळातील एलो रेटिंग) ओलांडणे यासारख्या इतर भारतीय बुद्धिबळपटूंच्या निकालांनी मला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा दिली’, असे त्याने सांगितले.
‘दुसरे कारण म्हणजे मी माझ्या खेळावर खूश नव्हतो. मला अधिक चांगले खेळायचे होते. म्हणून मी सराव करत राहिलो’, असे प्रज्ञानंदने पत्रकारांना सांगितले. त्याने भविष्यातील स्पर्धांमध्ये सर्वोत्तम खेळ करण्याचा निर्धारही व्यक्त केला आणि सांगितले की, मला प्रत्येक स्पर्धेत सर्वोत्तम प्रयत्न करायचे आहेत. या स्पर्धेतून माझा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही (प्रज्ञानंद आणि गुकेश) खेळाबद्दल फारच कमी बोललो, असेही त्याने सांगितले.
प्रज्ञानंदची बहीण आणि बुद्धिबळ ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबू हिनेही भावाने स्पर्धेसाठी घेतलेल्या कठोर परिश्रमांबद्दल कौतुक केले आणि सांगितले की, त्याने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. गेल्या काही महिने त्याच्यासाठी चांगले गेले नव्हते, म्हणून मी त्याच्या विजयावर आनंदित आहे आहे. तो या विजयास पात्र आहे. यामुळे त्याला अधिक चांगली कामगिरी करण्याची आणि अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळेल. आम्ही खेळाबद्दल खूप चर्चा करतो, असेही ती म्हणाली.