टाटा स्टील बुद्धिबळ : प्रज्ञानंद विजयी
गुकेश, एरिगेसीचे सामने बरोबरीत
वृत्तसंस्था/ विज्क आन झी (नेदरलँड्स)
87 व्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आपल्याच देशाच्या पी. हरिकृष्णचा पराभव केला, तर अर्जुन एरिगेसीने आपला सामना बरोबरीत सोडवला. विश्वविजेता डी. गुकेशनेही रशियन-स्लोव्हेनियन व्लादिमीर फेडोसेव्हसोबत बरोबरी साधली, तर लिओन ल्यूक मेंडोन्साने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हविरुद्ध आणखी एक सामना गमावला.
19 वर्षीय प्रज्ञानंदचा हरिकृष्णवरचा विजय हा बचाव आणि प्रतिआक्रमणाच्या मिलाफाचा ‘मास्टर क्लास’ होता. सलग दुसऱ्यांदा पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळत असलेल्या हरिकृष्णला मधल्या खेळात थोडी चांगली कामगिरी करूनही त्याचा जादुई स्पर्श सापडला नाही. मात्र प्रज्ञानंदचे पारडे जड राहिले आणि अखेरच्या टप्प्यातील खेळ, जो बरोबरीत सुटायला हवा होता, तो त्याच्या बाजूने झुकला. प्रतिकार करणे आवश्यक असताना हरिकृष्णने हार पत्करली आणि प्रज्ञानंदने त्याचा पुरेपूर उपयोग करून विजय मिळवला.
एरिगेसीने स्थानिक खेळाडू अनीश गिरीविऊद्ध खेळताना जोरदार दबाव आणला. अनीश सुऊवातीच्या फेरीत गुकेशविऊद्ध जवळजवळ जिंकण्याच्या परिस्थितीत आला होता, मात्र त्यानंतर त्याला हार स्वीकारावी लागली होती. दोन्ही खेळाडूंनी ‘एंड गेम’मध्ये जोरदार संघर्ष केल्याने सामन्याला एक मोठे वळण मिळाले, परंतु शेवटी बहुतेक तज्ञांना जसे अपेक्षित होते तसाच निकाल बरोबरीत सुटला.
फॅबियानो काऊआना हा दिवसातील सर्वोत्तम खेळाडू राहिला. त्याने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम डच खेळाडू जॉर्डन व्हॅन फॉरेस्टचे आव्हान हळूहळू चिरडले. तत्पूर्वी, गिरीविऊद्धच्या तणावपूर्ण सामन्यानंतर गुकेशने काळ्या सोंगाट्यासह खेळताना आरामात खेळ केला आणि फेडोसिव्हविऊद्ध कधीही तो अडचणीच्या स्थितीत आला नाही. त्याने जास्त त्रास न घेता बरोबरी साधली. मेंडोन्सा याच्यासाठी मात्र हा वाईट दिवस ठरला. त्याने फ्रेंच बचाव खेळण्याचे निवडले आणि उझबेक खेळाडूच्य काही नवीन कल्पनांचा सामना केला. मात्र सरतेशेवटी अब्दुसत्तोरोव्हने आपल्याला असलेल्या संधीचा फायदा घेत त्याच्यावर विजय नोंदविला.
चॅलेंजर्स विभागात आर. वैशालीला 14 वर्षीय चिनी खेळाडू मियाओई लूविरुद्ध पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना तीव्र लढाईनंतर गुण विभागून घेणे भाग पडले. पहिल्या फेरीतील पराभवानंतर दिव्या देशमुखने पुनरागमन करताना या विभागात चेक रिपब्लिकच्या अव्वल मानांकित गुयेन थाई व्हॅन डॅमसोबतचा सामना बरोबरीत सोडवून आपले खाते उघडले.