टाटा समूह 2 कंपन्यांचे अधिग्रहण करणार, 7 हजार कोटींची तरतूद
कॅपिटल फूडस्, ऑरगॅनिक इंडियाचे अधिग्रहण
नवी दिल्ली
टाटा कन्झ्युमर लिमिटेडने कॅपिटल फुड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑरगॅनिक इंडिया या कंपन्यांचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्यांच्या खरेदी करिता 7000 कोटी रुपये मोजले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
टाटा समूहातील टाटा कन्झ्युमर लिमिटेडने अजय गुप्ता यांनी स्थापन केलेली कॅपिटल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 5100 कोटी रुपये मोजून खरेदी केली आहे. यासंदर्भात करारावर दोन्ही कंपन्यांकडून स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. संचालक मंडळाची परवानगी मिळाल्यानंतर कंपनी सुरुवातीला 75 टक्के इतकी हिस्सेदारी कॅपिटलमध्ये खरेदी करणार आहे. कॅपिटलमधील उर्वरित 25 टक्के हिस्सेदारी तीन वर्षाच्या कालावधीमध्ये खरेदी केली जाणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. या नव्या अधिग्रहणानंतर कंपनीला खाद्य आणि पेय क्षेत्रामध्ये व्यवसाय विस्तार करणे शक्य होणार आहे. कॅपिटल फुडस् कंपनी पॅकेज्ड खाद्यपदार्थ व मसाल्यांचा व्यवसाय करते. चिंग्स सिक्रेट आणि स्मिथ अँड जोन्स ब्रँड अंतर्गत चटणी, मसाला, सॉस, नूडल्स, सूप यासारख्या उत्पादनांची विक्री कंपनी करते.
ऑरगॅनिक इंडियाचे अधिग्रहण 3 महिन्यात होणार
दुसरीकडे टाटा कन्झ्युमर लिमिटेडने आरोग्य आणि वेलनेस क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या ऑरगॅनिक इंडिया कंपनीचे देखील अधिग्रहण केले आहे. या अंतर्गत कंपनीने 1900 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती आहे. ऑरगॅनिक इंडिया या कंपनीची फॅबइंडियाकडे मालकी आहे. यायोगे टाटा कन्झ्युमर फॅब इंडियासोबत रोखीने व्यवहार करत 100 टक्के अधिग्रहण करणार आहे. अधिग्रहणाचे कार्य पुढील तीन महिन्यांमध्ये पूर्ण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऑरगॅनिक इंडिया अंतर्गत हर्बल सप्लीमेंट, चहा व ऑरगॅनिक पॅकेज्ड खाद्यपदार्थांचा समावेश आहे.