स्वादाचे असते व्यक्तिमत्त्वाशी कनेक्शन
आपल्याला कोणत्या चवीचे किंवा स्वादाचे खाणे आवडते, यावर आपले व्यक्तिमत्त्व अवलंबून असते, असे नव्या संशोधनात आढळून आले आहे. तसा हा शोध पहिल्यांदाच लागलेला आहे, असे नव्हे. पण अलीकडच्या काळात त्याचे निश्चित पुरावे सापडलेले आहेत. विशेषतः ज्यांना गोडापेक्षा तिखट खाणे आवडते आणि सपक खाण्यापेक्षा मसालेदार पदार्थ आवडतात, त्यांचे व्यक्तिमत्त्वही तसेच मसालेदार असते, असे व्यापक निरीक्षणात दिसून आले आहे.
असे दिसून आले आहे, की 93 टक्के लोकांना तिखट आणि मसालेदार पदार्थ आवडतात. मात्र, यापैकी सर्वांनाच अतितिखट किंवा अतिचमचमीत पदार्थ आवडतात, असे नाही. 36 टक्के लोकांना मध्यम तिखट चवीचे तर 24 टक्के लोकांना कमी तिखट पण सपक नव्हेत, असे पदार्थ आवडतात. अतिशय तिखट खाणाऱयांची संख्या केवळ 7 टक्के असते. तर जवळपास 10 टक्के लोकांना अतिशय कमी तिखट पदार्थ चालतात. तिखट खाणाऱया लोकांचे वैशिष्टय़ असे, की ते स्वतःला अन्य लोकांपेक्षा अधिक स्मार्ट समजतात. त्यांच्या चालण्या-बोलण्यामध्येही हा तोरा दिसून येतो. तिखट आवडणारे लोक समाजामध्ये मिसळण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. ते स्वतःला एक्स्ट्रोव्हर्ट समजतात. गप्पा मारणे हा त्यांचा छंद असतो, असेही सर्वेक्षणकर्त्यांचे म्हणणे आहे.
तिखट आवडणाऱयांपैकी साधारणतः 32 टक्के लोक शाकाहारी असल्याचेही आढळून येते. अशा लोकांना प्रवासाचा छंद असतो. खाण्यापिण्याच्या बाबतीत नवीन प्रयोग करावयास ते मागेपुढे पहात नाहीत. याउलट अतिगोड पदार्थ आवडणारे लोक एकलकोंडे असल्याचेही दिसून येते. त्यांच्या शारीरिक हालचाली तिखट खाणाऱयांच्या तुलनेत हळू असतात. अर्थात वरील निरीक्षणे सर्वांच्याच बाबतीत खरी ठरतात, असे नव्हे. त्याला अपवादही अनेक आहेत. पण सर्वसाधारणपणे हे निकष खरे ठरत आहेत, असे सर्वेक्षणकर्ते म्हणतात.