निवडणूक आयोगाकडून टास्क फोर्स स्थापन
वाढत्या उष्णतेची पार्श्वभूमी : मतदानाच्या कमी प्रमाणामुळे वाढली चिंता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाढती उष्णता आणि पहिल्या टप्प्यात कमी झालेल्या मतदानामुळे निवडणूक आयोगाची चिंता वाढली आहे. आगामी काळात तापमानामुळे मतदारांच्या वाढणाऱ्या अडचणी लक्षात घेत आयोगाने सोमवारी एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. निवडणूक आयोगाने भीषण उष्णता आणि उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी टास्क फोर्स स्थापन केले आहे. या टास्क फोर्समध्ये निवडणूक आयोग, हवामान विभाग, एनडीएमए आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी असतील. निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्याच्या 5 दिवसांपासून उष्णतेच्या लाटेची समीक्षा करणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान उष्णतेच्या लाटेवरून मोठी चिंता नाही. दुसऱ्या टप्प्यात हवामान सामान्य राहणार आहे. मे आणि जून महिन्यातील मतदानादरम्यान देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट राहू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
अखेर वाढत्या तापमानादरम्यान मतदारांना सुविधा प्रदान करत मतदानाचे प्रमाण कसे वाढवावे यावर बैठकीत अधिकाऱ्यांनी विचार मांडले आहेत. या बैठकीत भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्र देखील सामील झाले. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू सामील झाले. याचबरोबर भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अधिकारी बैठकीत उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान उष्मालाटेमुळे होणारे धोके कमी करण्याच्या उपायांवर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. देशात लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप 6 टप्प्यांमधील मतदान व्हायचे आहे. भारतीय हवामान विभाग निवडणूक आयोगाच्या सातत्याने संपर्कात आहे. हवामान पुर्वानुमानासोबत आम्ही मासिक, साप्ताहिक, दैनंदिन पूर्वानुमान जारी करत आहोत. तसेच उष्णतेच्या लाटा आणि आर्द्रतेच्या पातळीविषयी पूर्वानुमान उपलब्ध करून देत आहोत. विविध टप्प्यांमध्ये जेथे मतदान होणार आहे त्या ठिकाणांसंबंधी इनपूट आणि पुर्वानुमान आयोगाला प्रदान करत आहोत, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले आहे.
पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमधील 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे. यातील त्रिपुरामध्ये सर्वाधिक म्हणजे 80.17 टक्के मतदान झाले आहे. तर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तेथे 77.57 टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी मतदान बिहारमध्ये झाले असून तेथे 48.50 टक्के मतदान झाले आहे.
यापूर्वी 11 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उष्णतेचा वाढता प्रकोप पाहता एक बैठक घेतली होती. या बैठकीत पंतप्रधानांना एप्रिल ते जून या कालावधीतील पूर्वानुमानाविषयी माहिती देण्यात आली होती. देशाच्या बहुतांश हिस्स्यांमध्ये या कालावधीत तुलनेत अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. यात पश्चिम हिमालयीन क्षेत्र, ईशान्येतील राज्ये, उत्तर ओडिशाच्या काही हिस्स्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानुसार ओडिशा, रायलसीमा (आंध्र), पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणातील काही हिस्स्यांमध्ये कमाल तापमान 42-45 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले आहे. बिहार, मध्यप्रदेश, तामिळनाडू, पु•gचेरी आणि उत्तरप्रदेशच्या काही हिस्स्यांमध्ये कमाल तापमान 40-42 अंश सेल्सिअसदरम्यान राहिले आहे.