तासगाव स्फोटाने हादरले! दोन शतकापासून असलेले दुकान जळून खाक
शोभेच्या दारू कामातील कच्चामाल जळून खाक
तासगाव प्रतिनिधी
तासगाव शहरातील सोमवार पेठ येथील दोन शतकापासून असलेल्या शोभेच्या दारू कामातील कच्चामालाच्या दुकानास आग लागून भीषण स्फोट झाला. या आगीत दुकानासह घराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तब्बल अडीच तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
तासगाव ते सोमवार पेठ येथे महेश कोकणे यांचे शोभेच्या दारू कामातील कच्च्या मालाचे पुरवठा करण्याचे दुकान आहे. त्यामध्ये गंधक, सुरमेट (स्वरा) कोळसा, सिल्व्हर, गोल्डन यासह इतर कच्च्या मालाची विक्री पूर्वीपासून होत आहे.
सोमवारी सायंकाळी सातच्या दरम्यान कोकणे यांच्या येथील दुकानास व घरास अचानक आग लागली. बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले. भीषण आग व धुरांचे लोट पहावयास मिळाले. याचवेळी शोभेच्या दारूकामातील साहित्याने पेट घेतल्याने अनेक स्फोट झाले. या स्फोटाने सोमवार पेठसह तासगाव शहर हादरून सोडले.
रात्री साडेनऊच्या दरम्यान ही आग तासगाव नगर परिषदेचे दोन अग्निशमन बंब तसेच विटा येथील एक व भिलवडी येथील एक व सांगली येथील दोन अशा अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ही आग आटोक्यात आणण्यात आणली.
या आगीने सतत होत असलेल्या स्फोटामुळे संपूर्ण शहर हादरून गेले होते. तर आगीचे वृत्त समजताच तहसीलदार रवींद्र रांजणे, प्रशासक तथा मुख्यधिकारी पृथ्वीराज पाटील, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आगीत नेमके किती नुकसान झाले हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.