Bus Stand: तासगाव बसस्थानकात पाकीटमारी करणारी वृद्धा पोलीसांच्या ताब्यात
पाकीट चोरणाऱ्या संशयित वृद्धेस पोलिसांनी ताब्यात घेतले
तासगाव : येथील बसस्थानकात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील १९ दिवसात तब्बल ५ लाख ४८ हजारांचे दागिने चोरट्यांनी बसस्थानकातून लंपास केले आहेत. असे असतानाच मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास फलाट क्रमांक चार वरील तासगाव-सावळज बसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाच्या खिशातील पाकीट चोरणाऱ्या संशयित वृद्धेस पोलिसांनी ताब्यात घेतले. ही पाकीटमारी पोलीस व बसस्थानकातील सतर्क अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे उघडकीस आली.
तासगाव बसस्थानकात वारंवार चोऱ्यांचे प्रकार घडू लागल्याने सुळसुळाट असे वृत्त प्रसिद्ध केले होते. सदर वृत्ताची दखल घेत तासगाव पोलिसांनी अधिकचा बंदोबस्त स्थानकात ठेवला आहे. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक चारवर तासगाव-सावळज बस लागली असता या बसमध्ये चढणाऱ्या सावळज येथील बाळू भीमराव कांबळे या प्रवाशाचे पॅन्टच्या त्यांच्या खिशातील पाकीट चोरीस गेले.
काही काळातच सदरची बाब बाळू कांबळे यांच्या लक्षात आली. यावेळी, स्थानकात बंदोबस्तास असलेले पोलिस अंमलदार शशिकांत सोरटे, सचिन जौजाळ यांच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांनी चोरट्याचा माग काढण्यासाठी तातडीने सी.सी.टीव्ही कॅमेरा फुटेज चेक करण्यास सुरुवात केली.
स्थानकप्रमुख संजय माने, विक्रम पाटील, योगेश वाठारकर पोलीस अमंलदार शशिकांत सोरटे, सचिन जौजाळ यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिताफीने पाकीटमारी करणाऱ्या वृद्धेस ताब्यात घेतले. या वृद्धेच्या ताब्यात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीत कांबळे यांचे पैशासह पाकीट मिळून आले. यानंतर सोरटे यांनी स्थानकात इतर पोलीस कर्मचारी बोलावून घेतले. सदर वृद्धेस पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले
पोलीस व एसटी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेतून चोरी उघकीस...
मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास स्थानकात चोरीचा प्रकार घडताच, पोलीस अंमलदार शशिकांत सोरटे, सचिन जौजाळ व एसटीचे अधिकारी स्थानकप्रमुख संजय माने, विक्रम पाटील योगेश वाठारकर यांनी सतर्कतेने सी.सी.टीव्ही फुटेज चेक करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्थानकात प्रवाशाच्या खिशातील पाकीट मारणाऱ्या संशयित वृद्धेस ताब्यात घेतले.
'तरुण भारत संवाद'च्या वृत्तानंतर अधिकचा बंदोबस्त...
तासगाव एसटी बसस्थानकात गेल्या काही दिवसापासून गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत असलेल्या महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास करण्याचे प्रमाण वाढले आहे. १९ दिवसात ५ लाख ४८ हजार रुपयांचे तब्बल पावणे चौदा तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर 'तरुण भारत संवाद'ने मंगळवारी एसटी बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तासगाव एसटी बस स्थानकात अधिकचा पोलीस बंदोबस्त पहावयास मिळाला.