For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीवनातील आपलं उद्दिष्ट मनाला समजाऊन सांगावं

06:28 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
जीवनातील आपलं उद्दिष्ट मनाला समजाऊन सांगावं
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, माणसाची एक इच्छा पूर्ण झाली की पुढली तयारच असते. इच्छा पूर्ण झाली तरी पुढील इच्छा झाल्यामुळे अतृप्त आणि पूर्ण झाली नाही तरी अतृप्त अशा कचाट्यात मनुष्य सापडतो. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था होते. हे इच्छाचक्र आयुष्यभर माणसाच्यामागे भडकलेल्या अग्निसारखं लागलेलं असतं आणि मनुष्य त्याची दाहकता सोसत जगत असतो. त्यात मनुष्य शिकलेला असेल तर बघायलाच नको कारण त्याला शिक्षणामुळे अहंकाराची जोड लाभलेली असते. मला सगळं कळतंय ह्या भ्रमामुळे तो ह्या दाहकतेचा जास्त अनुभव घेतो. त्याच्या अहंकारी मनात विविध इच्छा होत असतात. स्वत:ला कर्ता समजत असल्याने कधी बुद्धीची संमती घेऊन, तर कधी परस्परच तो त्याची इच्छा इंद्रियांच्याकडून विषयांची माहिती घेऊन पूर्ण करून घेतो. ज्ञानाच्या घमेंडीत असल्याने त्याचे त्याच्या बुद्धीच्या विवेकी भागाकडे दुर्लक्ष होते आणि बुद्धीच्या स्वार्थी भागाचे मनाशी एकमत होते. ही दाहकता जर अनुभवायची नसेल तर काय उपाय करायचा ते पुढील श्लोकात सांगतो.

तस्मान्नियम्य तान्यादौ समनांसि नरो जयेत् ।

Advertisement

ज्ञानविज्ञानयो शान्तिकरं पापं मनोभवम् ।। 41।।

अर्थ- अगोदर मनासह इंद्रियांचे नियमन करून त्यांना जिंकावे. मनापासून उत्पन्न होणारे पाप ज्ञान व विज्ञान यांचा नाश करणारे आहे.

विवरण- माणसाला निरनिराळ्या इच्छा होत असतात. त्या हेरून त्याची ज्ञानेंद्रिये त्याला त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली माहिती पुरवत असतात. शब्द, स्पर्श, गंध इत्यादींच्या द्वारे मनाला त्या त्या गोष्टींची भुरळ पडते. ती गोष्ट मनाला हवीशी वाटू लागते. एक उदाहरण पाहू. समजा एखाद्या माणसाला जिलेबी खायची इच्छा झाली आहे. त्याबरोबर त्याला मिठाईचे दुकान आठवते. तेथील निरनिराळ्या मिठाया त्याच्या नजरेसमोर तरळू लागतात. तो ताबडतोब तिकडे जायला निघतो. तेथे गेल्यावर ताटात ठेवलेल्या गरम गरम केशरी रंगाच्या जिलब्या त्यांच्या येणाऱ्या मधुर स्वादामुळे त्याचे चित्त आकर्षून घेतात. त्या विकत घेऊन तो त्याची इच्छा पूर्ण करतो.

माणसाने अमुक एक गोष्ट आपल्याला हवी असे ठरवले की, त्या वस्तू मिळवण्यासाठी ते हातपायादी इंद्रियांना आज्ञा देते आणि त्यानुसार इंद्रियांच्या हालचाली चालू होतात. इच्छित वस्तू मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची मनाची तयारी असते. सर्वजण तसंच करतायत मग मी केलं म्हणून कुठं बिघडलं ह्या विचारातून पापकर्मे सहजी घडतात आणि हळूहळू मनुष्य पतीत होतो. असा मनुष्य आयुष्यभर असमाधानी असतो आणि खेदाची बाब म्हणजे आपल्यापैकी बहुतेकजण असंच जीवन जगत असतात कारण जन्माला येऊन आपलं स्वरूप ओळखून त्याच्यात विलीन होऊन जायचं आहे हे विसरून समोर दिसणाऱ्या नाशवंत गोष्टींच्या मागे लागून आपण अमुल्य अशा मनुष्य जन्मातील वेळ वाया घालवतो. इच्छा झाली की, मनुष्य ती पुरी करण्याच्यामागे लागणारच कारण हा मनुष्यस्वभाव आहे. त्यामुळे अशा वस्तू मुळीच मिळवू नयेत असे नाही पण त्या सचोटीनं मिळवण्याचा प्रयत्न करावा. मिळाल्या तर ठीक आणि न मिळाल्या तर देवाची तशीच इच्छा होती असं समजून स्वस्थ रहावं हा राजमार्ग आहे. या गोष्टीचं सतत ध्यान असावं.

यासाठी बाप्पा सांगतायत, जीवनातील आपलं उद्दिष्ट आपल्या मनाला समजाऊन सांगावं. इंद्रियांनी रंग, रूप, रस, स्पर्श, आवाज या द्वारे कितीही आकर्षक गोष्टी दाखवून दिल्या तरी त्याला बळी पडू नये म्हणून मनाची समजूत घालावी. आपल्या मनाला त्याची इच्छा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून कष्टी होऊ देऊ नये. असे करत गेल्यास इच्छाचक्राची दाहकता त्याला सोसावी लागणार नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.