दुसऱ्या मोठ्या हिऱ्याचा शोध
जगात आतापर्यंत सापडलेल्या हिऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या हिऱ्याचा शोध आफ्रिकेतील बोत्सवाना येथे लागला आहे. ‘ल्युकारा डायमंड’ या कॅनडाच्या कंपनीला हा हीरा गवसला आहे. तो 2 हजार 492 कॅरेट्सचा असून त्याची किंमत कमीत कमी 4 कोटी डॉलर्स (जवळपास 340 कोटी रुपये) होईल असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. जगातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हिऱ्याचा शोध दक्षिण आफ्रिकेतच 1905 मध्ये लागला होता. तो 3 हजार 106 कॅरेटस्चा होता. सध्या तो ब्रिटनच्या राजघराण्याच्या कोषागारात आहे.
हा हीरा ईशान्य बोत्सवाना येथील कारोवे नामक खाणीत गवसला आहे. तो शोधण्यासाठी क्ष-किरण तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. कंपनीने त्याची नेमकी किंमत घोषित केलेली नाही. मात्र, ती 4 कोटी डॉलर्सच्या वरच असेल, असे तज्ञांचे मत आहे. हिऱ्यांच्या खाणीतील मोठे हीरे शोधून काढण्यासाठी या कंपनीने मेगा डायमंड रिकव्हरी एक्स रे ट्रान्समिशन नामक तंत्रज्ञान विकसीत केले आहे. त्यामुळे कमी वेळेत आणि कमी खोदकाम करुन मोठे हिरे मिळविता येतात. कारोवे खाणीत असे मोठे हीरे विपुल प्रमाणात सापडतात.
हा पांढऱ्या रंगाचा हीरा आहे. त्याला पैलू पाडण्याचे काम केव्हा केले जाणार याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच पैलू पाडले जाणार की तो त्याच्या नैसर्गिक अवस्थेतच ठेवला जाणार, याचाही निर्णय व्हायचा आहे. कंपनीने शोधलेल्या नव्या क्ष किरण तंत्रज्ञानामुळे अशा अनेक मोठ्या आकाराच्या हिऱ्यांचा शोध लागलेला आहे. त्यामुळे कंपनीने हे तंत्रज्ञान शोधण्यासाठी केलेली गुंतवणूक योग्यच होती, हे या हिऱ्यावरुन दिसून येते, असे कंपनीचे म्हणणे आहे. सध्या हा हीरा कंपनीच्या मुख्य कार्यालयात आणण्यात आला असून त्याचे काय करायचे, यासंबंधीचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.