‘तरुण भारत’ युट्यूबचे विद्यार्थ्यांकडून सारथ्य
बालदिनानिमित्त बनले न्यूज अँकर : कॅमेऱ्यासमोर बोलण्याची संधी : उपक्रमाचे सर्वच स्तरांतून भरभरून कौतुक
बेळगाव : ‘नमस्कार...‘तरुण भारत’च्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत’ हा आवाज मागील सहा वर्षांपासून ‘तरुण भारत’च्या युट्यूब चॅनेलवरून प्रसारित होणाऱ्या बुलेटिनमध्ये ऐकावयास येत होता. सोमवारी रात्री मात्र आवाजातील बदलामुळे सारेच जण अवाक् झाले. न्यूज अँकरच्या जागी लहान मुलांचा आवाज ऐकू आल्याने ही नेमकी काय गम्मत आहे, हे जाणून घेण्याचे कुतूहल बेळगावकरांमध्ये जागे झाले. ‘तरुण भारत’ने आपल्या शतकोत्तर वाटचालीत अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत. असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम सोमवारी राबविण्यात आला. मंगळवार दि. 14 रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून अभिनव उपक्रम राबविण्यात आला. एसकेई सोसायटीच्या ठळकवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी चक्क बातम्या दिल्या. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.
अविस्मरणीय अनुभव
आजवर शालेय जीवनात कॅमेऱ्यासमोर बोलण्याची संधी क्वचितच कोणा विद्यार्थ्याला मिळाली असेल. परंतु, ‘तरुण भारत’मुळे लाखो सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचण्याची संधी ‘तरुण भारत’ने उपलब्ध करून दिली. हा अनुभव अविस्मरणीय असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगत ‘तरुण भारत’चे आभार मानले. तसेच आयुष्याच्या भावी वाटचालीत या अनुभवाची शिदोरी नक्कीच कामी येईल, अशाही भावना या विद्यार्थ्यांनी यावेळी बोलून दाखविल्या.