तरुण भारतने सात्विकता जपली!
सभापती रमेश तवडकर यांचे उद्गार : तरुण भारताचा 40 वा वर्धापनदिन उत्साहात,फोन, संदेशांद्वारे तसेच उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव
पणजी : दैनिक ‘तरुण भारत’ने संघर्षानंतर चांगली छाप समाजमनावर पाडली आहे. आज पत्रकारितेत कुणीही येतो. त्यामुळे सात्विकता नष्ट होत आहे आणि याचा परिणाम प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांवर होतो. ही परिस्थिती असूनसुद्धा आजपर्यंत तरुण भारतने पत्रकारितेतील सात्विकता जपून ठेवली आहे. माझ्यासारख्या ग्रामीण भागातील तऊणाला तरुण भारतने प्रकाशझोतात आणले, असे उद्गार गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी तऊण भारत गोवा आवृत्तीच्या 40 व्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना काढले. यावेळी व्यासपीठावर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, साळगावचे आमदार केदार नाईक, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, तरुण भारतचे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर, तऊण भारतच्या संचालिका सई ठाकुर-बिजलानी, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार केदार नाईक, मुख्य सचिव डॉ. कंदवेलू व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
106 वर्षांची परंपरा असलेल्या तसेच परखड वस्तुनिष्ठ बातम्यांनी वाचकांशी नाळ जोडणाऱ्या दैनिक ‘तरुण भारत’च्या गोवा आवृत्तीचा 40 वा वर्धापनदिन सोमवारी वाचक आणि हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादात व अपूर्व उत्साहात साजरा झाला. पणजी येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘तरुण भारत‘ वरील प्रेमाची प्रचिती दिली. यावेळी तरुण भारतचे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर, तरुण भारतच्या संचालिका सौ. सई ठाकुर-बिजलानी, तरुण भारत गोवाचे संपादक सागर जावडेकर यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. तरुण भारत गोवा आवृत्तीला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उपस्थित हितचिंतकांनी तसेच मान्यवरांनी 40 टाळ्या वाजवून मानवंदना दिली.
वृत्तपत्रांचे महत्त्व आजही अबाधित
यावेळी बोलताना तवडकर पुढे म्हणाले, अशा या परिस्थितीत वृत्तपत्रांचे महत्त्व पूर्वीपेक्षाही अधिक वाढलेले आहे. लोकांचा अजूनही वृत्तपत्रांवर विश्वास आहे. आणि या सगळ्यांमध्ये तरुण भारतने नवा आदर्श निर्माण केला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आजही पत्रकारितेकडे पाहिले जाते. त्यामुळे जे चांगले विषय आहेत ते समोर यायला पाहिजेत. तसेच वाईट गोष्ट घडली तर ती प्रभावी दृष्टिकोनातून समोर आली पाहिजे. माझ्यासारख्या ग्रामीण भागातील तरुणांना पुढे आणण्याचे कार्य तरुण भारतने केले आहे. 1998 साली ‘अशा संस्था असे कार्य’ या सदरातून लेख प्रसिद्ध केला आणि त्यानंतर रमेश तवडकर कोण हे लोकांना कळाले असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले. किरण ठाकुर यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून मोठे कार्य केले आहे. तरुण भारतची गोव्यातील 40 वर्षे पूर्ण झाली असून ती सकारात्मकतेची वाटचाल आहे. ते एक आदर्शवत असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी एक फार मोठे परिवर्तन घडवून आणले असून अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न त्यांनी सोडविलेला आहे. त्यांची ही महान कार्याची परंपरा अशीच पुढे जावी. तरुण भारतने गोव्याच्या सर्व क्षेत्रांवर आपला ठसा उमटवलेला आहे.
लोकशाहीच्या रक्षणासाठी वृत्तपत्र वाचन वाढले पाहिजे. वृत्तपत्राची विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची आहे. लोकांना काय वाटते हे अवलोकन झाले पाहिजे. तसेच 40 वर्षांचा हा ठेवा अनेकांनी राखून ठेवला आहे. निर्भिडता ?व विश्वासार्हता तरुण भारतने कायम राखली आहे. तऊणांकरिता मासिकापासून तरुण भारतची सुरूवात झाली. त्याला आता 106 वर्षे झाली आहेत. त्यावेळी मासिके वेगवेगळ्या कॉलेजमध्ये पाठविली जायची. त्यावेळी 3000 कॉपीज निघायच्या. 1948 मध्ये द्विसाप्ताहिक, 1966 मध्ये दैनिक सुरू झाले. त्यानंतर 1979 मध्ये आधुनिकता आणून 1982 साली सिंधुदुर्गमध्ये तर 1984 मध्ये गोव्यात तरुण भारत सुरू केले. त्यापूर्वी गोव्यात साप्ताहिक होते, असे किरण ठाकुर म्हणाले. गोवा सत्याग्रहात भारतभरातून लोक यायचे. त्यासाठी बेळगावमधून प्रवेश करायचे. त्यावेळी स्व. बाबुराव ठाकुर यांनी गोवा विमोचन समिती स्थापन केली. ते आलेल्या सत्याग्रहींचे स्वागत करत असत. फंड उभारणे, रसद पुरविली जात असे. यात बेळगावचा सहभाग होता. गोव्याला स्वातंत्र्य उशिरा मिळाले असले तरी बेळगाव आणि गोव्याचे नाते हे जवळचे होते. आता सर्वत्र अधोगती चालली आहे. प्रामाणिकपणा राहिलेला नाही. ग्रामीण भागात प्रामाणिकपणा आहे म्हणून वृत्तपत्र अजूनपर्यंत सुरू आहेत, असे किरण ठाकुर पुढे म्हणाले.
तरुण भारत अजूनही युवामनाचा आहे : गुदिन्हो
समाजात चांगले व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. वाईट गोष्टी घडत असतील तर त्यात सुधार आणणे महत्त्वाचे आहे. हे कार्य प्रसारमाध्यमे सदैव करत असतात आणि आम्ही हे वर्षानुवर्षे पाहत आलो आहोत. जेव्हा व्हिज्युअल मीडिया किंवा सोशल मीडिया आली तेव्हा प्रिंट मीडिया टिकेल की नाही अशी शंका प्रत्येकाच्या मनात होती. परंतु असे काही न होता प्रिंट मीडियावरील विश्वास आणखी गडद झाला. प्रिंट मीडिया ही एक जबाबदारी असते. प्रिंट मीडियाने आतापर्यंत मर्यादा आणि शिस्त सांभाळली आहे. विश्वासार्हता जपली आहे. आता व्हिडिओ मीडियामध्ये कुणीही संपादक होतो. ज्यापद्धतीने प्रिंट मीडियाने शिस्त पाळली आहे ती व्हिडिओ मीडियाने पाळली पाहिजे. सोशल मीडियावर लोक कमी विश्वास ठेवू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर तरुण भारतने ते प्रयत्न टिकवून ठेवले आहेत. किरण ठाकुर यांचे युवामन आहे. त्यांचे विचार तरुण आहेत. युवा ताकदीने ते पुढे जात आहेत. समाजाची चांगली सेवा करत आहेत, असे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
इतर वर्तमानाबरोबरच तरुण भारत आमच्या घरात एक घटक म्हणून येत असे. कॉलेजच्या काळात तरुण भारत हा घरातला एक सदस्य असायचा. पत्रकारिता हे व्रत आहे. ते व्रत अखंडपणे 40 वर्षे निर्भिडपणे तरुण भारतने चालू ठेवले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून एक अग्निदिव्य पार पाडत आहे. सुरूवातीच्या काळापासून आतापर्यंत तरुण भारत पोक्तपणे वागत असून समाजसेवेचे अखंड व्रत घेतले आहे. राजकीय नेतेसुद्धा कुठेतरी चुकतात आणि ती चूक दाखवून देण्याकरिता वर्तमानपत्रे मोलाची कामगिरी पार पाडतात. आम्हा राजकीयांना वाट दाखविणे गरजेचे आहे. यातूनच आम्हाला सर्व गोष्टी कळतात. डिजीटल माध्यमे आली तरी सकाळचा चहा हा वर्तमानपत्र हातात आल्याशिवाय पूर्ण होत नाही, हे आजही वास्तव आहे, असे दामू नाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी तिरुपतीहून दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी तिऊपती येथून दैनिक तरुण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्याशी फोनवर संपर्क साधून दैनिक तरुण भारतच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, कार्यक्रमास उपस्थित राहण्याची आपली इच्छा होती परंतु तिरुपती येथे एका राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी आपल्याला जावे लागले. त्यामुळे आपण कार्यक्रमास उपस्थित राहू शकलो नाही, असे सांगून त्यांनी याबद्दल खेद व्यक्त केला आणि तरुण भारतच्या संपूर्ण परिवाराला आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.