मंत्रिपदाची ताकद केसरकरांना कळलीच नाही
प्रवीण भोसलेंची टीका
सावंतवाडी । प्रतिनिधी
दीपक केसरकर गेली पंधरा वर्षे सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी पाच वर्षे गृह ,अर्थ ,राज्यमंत्री आणि गेली अडीच वर्षे शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम केले आहे . परंतु त्यांच्या आमदारकीचा आणि मंत्रीपदाचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कोणताही फायदा झालेला नाही त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातील जनतेने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवावे असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवीण भोसले यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केले. आजगाव परिसरात जेएसडब्ल्यू कंपनीचा मायनिंग प्रकल्प होत आहे. या प्रकल्पामुळे आजगाव परिसरातील गावे उद्धवस्त होणार आहेत. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. यासंदर्भात दीपक केसरकर यांच्यासह खासदार नारायण राणे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहनही भोसले यांनी केले .
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. केसरकर यांच्या बाबत माझ्या मनात कोणताही द्वेष नाही. त्यांच्यावर टीका करायची म्हणून टीका करत नाही. परंतु गेल्या पंधरा वर्षात जे पाहिले त्या अनुषंगाने मी माझी भूमिका मांडत आहे. मंत्री पदाची काय ताकद असते हे मला माहित आहे. मंत्री पदाच्या माध्यमातून राज्याचा आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचा विकास करता येतो परंतु केसरकर यांनी मंत्रीपदाचा वापर मतदारसंघाच्या विकासासाठी केलेला नाही. मतदार संघात भरीव असे कोणतेही काम केलेले नाही. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ,सावंतवाडी बस स्थानक सावंतवाडी पंचायत समिती इमारत, सावंतवाडी तालुक्याचे क्रीडा संकुल, अशी कामे त्यांनी अर्धवट स्थितीत ठेवली . निवडणूक आली की लोकांना गाजर दाखवायची हेच काम त्यांनी केलेले आहे. आता निवडणूक जवळ आल्यानंतर त्यांनी लोकांना बाजापेठीचे आश्वासन देण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षीही गणेश चतुर्थी उत्सव होता परंतु त्यावेळी त्यांनी बाजापेटी का दिली नाही असा सवाल केला . यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस आणि शिक्षक त्या त्या जिल्ह्यातील असावेत असा संकेत होता . तसे धोरण राज्य शासनाने आखले होते . परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस आणि शिक्षक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिसत नाही पोलीस आणि शिक्षक बाहेरचे दिसत आहे शिक्षण मंत्री असूनही जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांना केसरकर न्याय देऊ शकले नाहीत . आता ते कंत्राटी शिक्षकाचे निवडणूक जवळ आल्याने आश्वासन देत आहे . डीएड धारकांवर त्यांनी अन्याय केला आहे. मंत्री म्हणून ते धोरण ठरवू शकले असते. त्यांना मंत्रीपदाची ताकद कळलेली नाही. अशी टीका प्रवीण भोसलेंनी केली .