मोती तलाव घेणार मोकळा श्वास
नगरपालिका प्रशासनाला जाग ; तरुण भारतने वेधले होते लक्ष
सावंतवाडी : प्रतिनिधी
‘सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावाच्या सौंदर्याला ग्रहण’ असे वृत्त ‘तरुण भारत संवाद’ तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच नगरपालिका प्रशासनाला जाग आली. सोमवारी पालिकेच्या माध्यमातून मोती तलावातील पाण्यात असलेल्या बाटल्या, कचरा, झाडी सफाई हाती घेण्यात आली. तलावात साचलेले शेवाळ आणि त्यामुळे सुटलेली दुर्गंधी यामुळे तलावाच्या सौंदर्याला अनास्थेचे ग्रहण लागले होते. ज्या भागात कचरा आणि प्लास्टिक साचले होते होते तेथे बसणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांकडून नगरपालिका प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला जात होता. तसेच तलावाच्या काठाच्या बाजूने वाढलेली झाडी, प्लॅस्टिक बाटल्या, तवंग, शेवाळ यामुळे तलावाला गटाराचे स्वरुप आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती. याबाबत ‘तरुण भारत संवाद’मधून आवाज उठविताच पालिकेला जाग आली. नागरिकांनीही याबाबत समाधान व्यक्त केले.