भारतावरील ‘टॅरिफ’ आठवडाभर लांबणीवर
अन्य 90 देशांनाही दिलासा : कॅनडासह काही देशांमध्ये अंमलबजावणीला प्रारंभ
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील 25 टक्के कर सात दिवस म्हणजेच आठवडाभरासाठी पुढे ढकलला आहे. ‘टॅरिफ’ची आजपासून लागू होणारी अंमलबजावणी आता 7 ऑगस्टनंतर सुरू केली जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी 92 देशांवरील नवीन करांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतावर 25 टक्के आणि पाकिस्तानवर 19 टक्के कर लादण्यात आला आहे. या सर्व देशांसाठी नवी करप्रणाली पुढील आठवड्यात सुरू केली जाणार आहे. तथापि, कॅनडासह अन्य काही देशांवर 1 ऑगस्टपासूनच 35 टक्के कर लादण्यात आला आहे.
अमेरिकेने सीरियावर सर्वाधिक 41 टक्के कर लादला गेला आहे. या यादीत चीनचे नाव नाही. दक्षिण आशियातील सर्वात कमी कर पाकिस्तानवर लादला आहे. अमेरिकेने यापूर्वी पाकिस्तानवर 29 टक्के कर लादला होता. ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी जगभरातील देशांवर कर लादण्याची घोषणा केली होती, परंतु 7 दिवसांनंतर तो 90 दिवसांसाठी पुढे ढकलला. काही दिवसांनी ट्रम्प यांनी 31 जुलैपर्यंत वेळ दिला. त्यानंतर, ट्रम्प सरकारने 90 दिवसांत 90 करार करण्याचे लक्ष्य ठेवले होते. तथापि, अमेरिका आतापर्यंत फक्त 7 देशांशी कराराची प्रक्रिया पूर्ण करू शकला आहे.
संतुलन राखण्याचा भारताचा प्रयत्न
अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले आहेत, परंतु दोघांमध्ये अनेक व्यापार आणि धोरणात्मक फरक आहेत. भारताने रशियाकडून शस्त्रs खरेदी करणे, शेती आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये अमेरिकेच्या प्रवेशाला विरोध करणे आणि जागतिक व्यापार संघटनेवरील संघर्ष आदी बाबींचा यात समावेश आहे. अशा परिस्थितीत भारतीय अधिकारी अजूनही कर प्रणाली अंतिम करण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे समजते.
सीरिया, लाओस, म्यानमारवर सर्वाधिक कर
अमेरिकेकडून सीरिया, लाओस आणि म्यानमार सारख्या गरीब देशांवर सर्वाधिक कर लादण्यात आला आहे. अमेरिकेने या दोन्ही देशांवर 40-41 टक्के इतका मोठा कर लादला आहे. अमेरिकेचा सीरियाशी खूप कमी व्यापार आहे, परंतु तरीही त्यावर 41 टक्के उच्च कर लादला गेला आहे. सीरियावर लादलेल्या दीर्घकालीन आर्थिक निर्बंधांचा हा परिणाम आहे. सीरिया 41 टक्के कर आकारणीसह यादीत अव्वल स्थानावर आहे. लाओस आणि म्यानमारवरही 40 टक्के कर आकारण्यात आला आहे. तसेच स्वित्झर्लंडवर 39 टक्के, इराक आणि सर्बियावर 35 टक्के कर आकारण्यात आला आहे. यादीनुसार, ब्राझील आणि ब्रिटनवर 10 टक्के आणि न्यूझीलंडवर 15 टक्के इतका न्यूनतम कर आकारण्यात आला आहे. भारताच्या कर यादीत बदल न होणे हे अमेरिका-भारत संबंधांमधील तणाव दर्शवते.