टॅरिफ-एफआयआय विक्रीचा बाजाराला फटका
सेन्सेक्स 96.01 तर निफ्टी 36.65 टक्क्यांनी घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील दुसऱ्या दिवशी मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णय जाहीर करण्याच्या संकेतामुळे आणि एफआयआयच्या विक्रीचा नकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. जागतिक बाजार घसरल्याने देशांतर्गत शेअर बाजारही पुन्हा एकदा नुकसानीसह बंद झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादण्याच्या आपल्या योजनेचा पुनरुच्चार केला आहे. यामुळे भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये नकारात्मक स्थितीर राहिली. तसेच, परदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सतत विक्री केल्याने बाजारावर परिणाम झाला आहे.
बीएसई सेन्सेक्स मंगळवारी 200 अंकांपेक्षा जास्त घसरून 72,817 वर खुला झाला आहे. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 96.01 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.13 टक्क्यांसह 72,989.93 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा ट्रेडिंगच्या सुरुवातीस 22 हजारांच्या खाली घसरला. मात्र दिवसअखेर निफ्टी हा 36.65 अंकांनी घसरुन निर्देशांक 22,082.65 वर बंद झाला. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, बजाज फिनसर्व्हचा शेअर सर्वाधिक 2.7 टक्क्यांवर बंद झाला. एचसीएल टेक, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, सन फार्मा, इन्फोसिस, मारुती, टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे प्रमुख घसरणीतील समभाग होते. बाजारामध्ये घसरण असूनही स्टेट बँक ऑफ इंडियाचे समभाग हे 3 टक्क्यांहून अधिक वाढून बंद झाले. याशिवाय, झोमॅटो, टीसीएस, पॉवरग्रिड, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, एल अँड टी, आयसीआयसीआय बँकेचे समभाग तेजीत होते.
परदेशी गुंतवणूकदारांची विक्री
परदेशी गुंतवणूकदार (एफआयआय) भारतीय शेअर बाजारात विक्री करत आहेत. सोमवारी, एफआयआयने भारतात 4,788.29 कोटी रुपयांचे समभाग विकले तर डीआयआयने 8,790.70 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले, ‘बाजारातील भावना मंदावली आहे आणि ती थोडीशी घसरण झाली आहे, ज्यामुळे सुधारणा दिसून आली. निफ्टीमध्ये सुरुवातीच्या घसरणीनंतर हळूहळू सुधारणा झाली. क्षेत्रीय ट्रेंड मिश्र राहिले. ऊर्जा, धातू आणि बँकिंग क्षेत्रांमध्ये वाढ झाली तर ऑटो आणि आयटी क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली नाही.’
जागतिक बाजारपेठेतून काय संकेत?
मंगळवारी जागतिक बाजारपेठेत मंदीचा कल दिसून आला. बहुतेक अमेरिकन शेअर बाजार सोमवारी खाली बंद झाले. प्रमुख वॉल स्ट्रीट निर्देशांकांमध्ये एस अँड पी 500 1.76 टक्के, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी 1.48 टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट 2.64 टक्के घसरण झाली, जी एनव्हीडियाच्या समभागांमध्ये 8 टक्क्यांहून अधिकची घसरण राहिली.