शुल्क अनिश्चितेने बाजारात दबावाचे वातावरण
सेन्सेक्स 166 अंकांनी घसरणीत : फार्मा, आयटी निर्देशांक नुकसानीत
मुंबई :
अमेरिकेकडून भारतावर पुन्हा शुल्कवाढ करण्याच्या धमकीचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर बुधवारी पाहायला मिळाले. सेन्सेक्स 166 अंकांनी घसरणीसोबत बंद झाला. आयटी व फार्मा या दोन निर्देशांकांनी बाजाराला खाली खेचले होते. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही, तरीही बँक निफ्टी निर्देशांक सकारात्मक स्थितीत बंद झाला.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 166 अंकांनी घसरुन 80544 च्या स्तरावर बंद झाला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 75 अंकांनी घसरत बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया 7 पैसे मजबूत झाला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 19 समभाग हे घसरणीसोबत बंद झाले होते. बँक निफ्टीतील 12 पैकी 8 बँकांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. बँक निफ्टी निर्देशांक अखेर 50अंकांनी वाढत 55411 च्या स्तरावर बंद झाला.
निर्देशांकांची कामगिरी
मिडकॅप निर्देशांक व स्मॉलकॅप निर्देशांकांची कामगिरी काहीशी नकारात्मक दिसून आली. निफ्टी आयटी निर्देशांक मोठ्या प्रमाणात दबावात कार्यरत होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा शुल्कबाबत धमकी दिल्याने त्याचा परिणाम आयटी निर्देशांक व काहीअंशी बाजारावर पाहायला मिळाला. आयटी निर्देशांक 608 अंकांनी घसरलेला होता. निर्देशांकांची बुधवारची एकंदर कामगिरी पाहता निफ्टी बँक व पीएसयु बँक निर्देशांकांनी तेजीसह बंद होण्यात यश मिळवले होते. फार्मा सलग दुसऱ्या सत्रात तर एफएमसीजी सलग तिसऱ्या सत्रात घसरणीत होता. रिअल्टी निर्देशांकही घसरणीत होता. एनएसडीएलचा समभाग बीएसईवर 880 रुपयांवर सुचीबद्ध झाला होता. समभागधारकांना प्रति समभाग 80 रुपयांचा लाभ प्राप्त करता आला. एशियन पेंटस्, एचडीएफसी लाइफ, ट्रेंट, अदानी पोर्टस, एसबीआय यांचे समभाग तेजीत होते तर विप्रो, सनफार्मा, इंडसइंड बँक, जियो फायनॅन्शीयल व टेक महिंद्रा यांचे समभाग घसरणीत राहिले होते.