For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये टार्गेट किलिंग

06:06 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये टार्गेट किलिंग
Advertisement

20 वर्षांपूर्वी दहशतवाद्यांकडून पित्याची हत्या, आता पुत्राचा घेतला जीव

Advertisement

वृत्तसंस्था/ राजौरी

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंग झाले आहे. राजौरी जिल्ह्यात एका शासकीय कर्मचाऱ्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात 40 वर्षीय मोहम्मद रजाक यांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी 20 वर्षांपूर्वी रजाक यांच्या पित्याची हत्या केली होती.

Advertisement

रजाक यांचा भाऊ प्रादेशिक सैन्यात कार्यरत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात दोन आठवड्यांमध्ये तिसरा हल्ला झाल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथे 7 मे रोजी मतदान होणार असून त्यापूर्वी दहशत निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांनी सामान्य लोकांना टार्गेट करण्याचे सत्र आरंभिले आहे.

रजाक यांच्या हत्येनंतर सुरक्षा दलांनी परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेतली. पूर्ण जिल्ह्यात सुरक्षादलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. रजाक यांच्या कुटुंबाने काश्मीर खोऱ्यात दुसऱ्यांदा टार्गेट किलिंगचे दु:ख झेलले आहे. 20 वर्षांपूर्वी रजाक यांचे पिता मोहम्मद अकबर यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

रजाक हे केंद्रशासित प्रदेशातील समाज कल्याण विभागात कार्यरत होते. रजाक यांच्या हत्येवर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शोकाकुल परिवाराप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. तर काँग्रेसने काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये एका महिन्याच्या कालावधीत टार्गेट किलिंगची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी दोन परप्रांतीय व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. अनंतनागमध्ये 17 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी बिहारी कामगार शंकर शाहची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यापूर्वी 8 एप्रिल रोजी शोपियां जिल्ह्यातील पदपावन येथे दहशतवाद्यांनी परप्रांतीय चालक परमजीत सिंह याची हत्या केली होती.

फेब्रुवारीत दोघांची हत्या

श्रीनगरमध्ये 7 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी हब्बा कदल भागात दोन शीखधर्मीयांची गोळ्या झाडून हत्या केली होती. अमृतसरचा रहिवासी अमृतपाल आणि रोहित मसीह अशी मृतांची नावे होती.

Advertisement
Tags :

.